'लोकल'ला बेशिस्तीचे ग्रहण! डोंबिवलीकरांचे हाल संपता संपेना; स्थानकावर दुसऱ्या दिवशीही तुडूंब गर्दी
By अनिकेत घमंडी | Updated: April 21, 2026 09:49 IST2026-04-21T09:47:28+5:302026-04-21T09:49:24+5:30
मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.

'लोकल'ला बेशिस्तीचे ग्रहण! डोंबिवलीकरांचे हाल संपता संपेना; स्थानकावर दुसऱ्या दिवशीही तुडूंब गर्दी
-अनिकेत घमंडी, डोंबिवली
डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी लोकल रेल्वेचा डबा घसरला. या अपघाताचे सलग दुसऱ्या दिवशीही परिणाम जाणवले. मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी कल्याणवरून विशेष लोकल सोडण्यात आल्याचे रेल्वेने जाहीर केले. त्यामुळे प्रवाशांचे सकाळपासून हाल सुरू झाले. प्रवासी डोंबिवलीत आणि विशेष ट्रेन कल्याणवरून का सोडल्या, असा सवाल त्रस्त प्रवाशांनी केला.
सोमवारी डोंबिवलीकरांचे अतोनात हाल झाले. महिला, पुरुष, विद्यार्थी सगळ्यांना लोकल रेल्वेच्या दिरंगाईचा फटका बसला. सोमवारी दिवसभर सगळा घोळ सुरू होता. पण, मंगळवारही त्याचे परिणाम दिसत आहे. सकाळही अशीच त्रासाची गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
लोकलमध्ये चढायलाही जागा नाही
फलाट तीन, पाचवर मुंबईकडे जायला प्रचंड गर्दी होती. कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल आधीच भरून आल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना गाडीत चढायला जागा मिळाली नाही, परिणामी सर्व फलाट गर्दीने तुडूंब भरलेले होते. लोकल रेल्वे विलंबाने धावत असल्याने दिवा स्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढत गेली.
सकाळच्या सत्रात अनेक गाड्या जलद सांगून धीम्या आणि धीम्या सांगून जलद काढल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. डोंबिवलीत गर्दी असल्याने ठाकुर्ली, कोपर स्थानकात देखील प्रचंड गर्दी झाली होती. एकूणच सोमवार नंतर मंगळवारची सुरुवातही मनस्ताप, घामाघुम, आणि लेटमार्कच्या दडपणाने झाली.
रेल्वे प्रशासन यमाच्या भूमिकेत.....
रोज मरे त्याला कोण रेड हि उक्ती रेल्वे प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली आहे. आज मुंबईकडून कल्याणच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलचे काही डबे रुळावरून घसरले आणि कसारा-कर्जतकडे जाणाऱ्या आणि कर्जत कसाराहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. तब्बल सकाळी 8.30 पासून दुपारी चार वाजेपर्यंत वाहतूक विस्कळित झाली होती.
आजमितीस रेल्वेचे अनेक मोठ मोठे प्रकल्प सुरू आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अधिकाऱ्यात समन्वय नसल्याने मागील पंधरा वर्षांपासून तिसरी रेल्वे मार्गिका अजूनही पूर्ण झालेली नाही.
मागील कोविड काळापासून विशेष ट्रेनच्या नावाने सुरू केलेल्या मेल एक्सप्रेस मधे दिवसागणिक वाढ करून अजमितीत 50/60 मेल एक्सप्रेस रोज धावत आहेत, त्यामुळे रोजच आम्हा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो, गर्दीमुळे रेल्वे प्रवासी रोज मरणयातना सहन करीत आहेत.
-राजेश घनघाव, (अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना)