लाचखोरीचे व्यसन सुटता सुटेना

By Admin | Updated: November 6, 2016 04:14 IST2016-11-06T04:14:29+5:302016-11-06T04:14:29+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना शनिवारी दुसऱ्यांदा लाचप्रकरणात अटक झाली. लाचखोरीच्या

Detainee gets a bribe addiction | लाचखोरीचे व्यसन सुटता सुटेना

लाचखोरीचे व्यसन सुटता सुटेना

- प्रशांत माने,  कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना शनिवारी दुसऱ्यांदा लाचप्रकरणात अटक झाली. लाचखोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांमध्ये १८ ते २० बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाली आहे. तर बोराडेंना पुन्हा अटक झाल्याने त्यांचे लाचखोरीचे व्यसन काही सुटेना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
लाचखोरांना कडक शासन करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे, याआधी पाहावयास मिळाली आहेत. या ‘अभय’ देण्याच्या प्रवृत्तीमुळेच सध्या लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी महापालिका सेवेत कार्यकारी पदावर आहेत. अनधिकृत बांधकाम असो अथवा नूतनीकरण, कामाचे कार्यादेश देणे असो अथवा ठेकेदारांची बिले मंजूर करणे, अशा विविध कारणांसाठी लाच मागून अमाप काळी माया जमा करणाऱ्यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास साधण्यात धन्यता मानल्याचे वास्तवही पाहावयास मिळत आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर दोन वर्षांत केडीएमसीच्या दोन नगरसेवकांनाही लाचप्रकरणात अटक झाली आहे.
तक्रारदाराने केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना भाजपाचे नगरसेवक गणेश भाने आणि त्याच्या एका साथीदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ आॅक्टोबरला अटक केली होती. याआधी मागील लोकप्रतिनिधींच्या कालावधीत १७ एप्रिल २०१४ ला शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना ४ लाखांच्या लाचप्रकरणी अटक झाली होती. त्यांच्याबरोबर तत्कालीन ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तूद आणि त्यांचा कर्मचारी विलास कडू, अशा तिघांना अटक झाली होती. दरम्यान, आॅक्टोबरमध्ये घडलेल्या घटनेला महिना उलटत नाही तोच लाचप्रकरणात बोराडे यांना अटक झाली आहे.

‘तो’ दिवसही शनिवार होता

1बोराडे यांना यापूर्वी १ फेब्रुवारी २०१४ ला अटक झाली होती. विशेष म्हणजे, तो दिवसही शनिवारच होता. त्यावेळी ‘क’ प्रभागाचे अधिकारी असताना बेकायदा बांधकामांवरील कारवाई टाळण्यासाठी बोराडे यांनी तीन लाखांची लाच मागितली होती. त्यावेळी त्यांच्यासह त्यांचा खाजगी वाहनचालक कय्युम चांद पाशा शेख याला नवी मुंबई लाचलुचपत विरोधी पथकानेही अटक केली होती. मूळचे मुख्य बाजार परवाना निरीक्षक असलेल्या बोराडे यांच्याकडे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

2केडीएमसी मुख्यालयानजीक असलेल्या शंकरराव चौकातील एका दुकानदाराने नूतनीकरणाचे काम काढले होते. या कामासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावर एमआरटीपीअंतर्गत कारवाई केली जाईल. ती टाळण्यासाठी पाच लाख रुपये द्या, अशी मागणी बोराडे यांनी त्याच्याकडे केली होती.
3अखेर पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये खाजगी वाहनचालक कय्युम शेख यांच्यामार्फत स्वीकारले होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कय्युम आणि लाच मागितल्याप्रकरणी बोराडे यांना अटक केली होती. ती वेळही दुपारचीच होती.

Web Title: Detainee gets a bribe addiction