'त्यावेळी मी नाशिकला होतो, उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा आरोप अमान्य'; राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:09 IST2026-05-14T13:08:43+5:302026-05-14T13:09:58+5:30
परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. कलम ३१३ नुसार न्यायालयाने राज यांच्यासह सर्व सात आरोपींचे जबाब नोंदविले.

'त्यावेळी मी नाशिकला होतो, उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा आरोप अमान्य'; राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात हजेरी
ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर रेल्वेच्या २००८च्या भरतीवेळी मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी दाखल खटल्यातील आरोप आपल्याला अमान्य असल्याचा पुनरुच्चार राज यांनी बुधवारी ठाणेन्यायालयासमोर केला. कलम ३१३ नुसार न्यायालयाने राज यांच्यासह सर्व सात आरोपींचे जबाब नोंदविले. घटनेवेळी आपण नाशिक येथे असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टोबर २००८ रोजी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आकाश काळे, संतोष ठाकरे, विशाल कांबळे, कैलास चौबे, गणेश चौबे, शैलेश जैन आणि नीलेश घोणे यांच्याविरुद्ध २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल झाले हाते.
आरोपींपैकी नीलेश याचा मृत्यू
पुरवणी आरोपपत्रात राज ठाकरे यांचेही नाव समाविष्ट झाले होते. आरोपींपैकी नीलेश याचा मृत्यू झाला. यापूर्वीच्या १२ डिसेंबर २०२५च्या सुनावणीसाठी सर्व आरोपी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याने राज यांच्यासह सर्व आरोपी हजर झाले होते.
बुधवारी ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा यापूर्वीच्या जबाबाप्रमाणेच राज यांनी आपल्याविरुद्धचे पुरावे आणि आरोप खोटे असून ते अमान्य असल्याचे स्पष्ट केले.
खटल्याबद्दल आपल्याला काही सांगायचे आहे का? अशी न्यायालयाने विचारणा केल्यावर त्या काळात आपण नाशिकला होतो, असे ते म्हणाले. ॲड.शैलेश सडेकर, सयाजी नांगरे आणि शुभम कानडे आदींनी राज यांच्यासह इतर आरोपींची बाजू मांडली. राज ठाकरे यांच्यासह इतर पाचही आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले, तसेच दहा साक्षीदारही तपासण्यात आले.
राज यांना पाहण्यासाठी वकिलांचीही गर्दी
राज ठाकरे ठाणे न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांच्यासमोर सायंकाळी ४:०० वाजता हजर झाले. त्यावेळी राज यांना पाहण्यासाठी आणि खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी अनेक वकिलांनीही गर्दी केली होती. या गर्दीतही राज यांनी फोटो काढण्याचा कार्यकर्त्यांचा हट्ट पुरविला. जबाब नोंदविल्यानंतर २० मिनिटांनी राज ठाकरे न्यायालयाबाहेर पडले.
कलम ३१३ नुसार राज ठाकरे यांचा न्यायालयाने जबाब नोंदविला. आपल्यावरील आरोप अमान्य असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले. ते निर्दोष सुटतील, असा विश्वास आहे.
-ॲड.शैलेश सडेकर, राज यांचे वकील.