Solapur Crime: पुण्यात चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरातही एका ५५ वर्षीय इसमाने १४ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केले. शाळेला सुट्या असल्याने पीडित मुलगी ही पुण्यातून सोलापुरातील नातेवाइकाकडे आली होती.
फुलचंद घाटांगरे (रा. सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, शेजाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अश्लील कृत्य करत असतानाच मुलगी ओरडली
४ मे रोजी रात्री पीडित मुलगी ही घरासमोरील अंगणात खेळत होती. तेव्हा दारूच्या नशेत आलेला फुलचंद तिच्याशी अश्लील कृत्य करीत होता. मुलगी जोरजोरात ओरडत असताना आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर त्याला पकडून ठेवले.
जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस येताच नागरिकांनी पकडून ठेवलेल्या त्या आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी घाटांगरे याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी
राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बार्शी सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
लखन ऊर्फ बापू जोतिबा सावंत (वय २९) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला दोन वर्षात न्याय मिळाला आहे.
१ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना, आरोपी लखन सावंत याने घरात चोर पावलाने प्रवेश केला आणि पीडितेवर अत्याचार केला.
पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आणि तिच्या आईने तत्परता दाखवल्यानंतर आरोपीला पळून जाण्यापूर्वीच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी धाडसाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
आईची साक्ष ठरली महत्त्वाची
अत्याचार प्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षाकडून प्रभावी युक्तिवाद मांडण्यात आला. यात पीडितेने तिची आई आणि न्यायालयासमोर दिलेली सुसंगत साक्ष महत्त्वाची ठरली. याबरोबरच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व आरोपीला घटनास्थळावरून पकडणाऱ्या ग्रामस्थांची साक्ष देखील महत्त्वाची ठरली.