झेंडावंदनाचं स्वप्न अन् मायक्रोसॉफ्टचं लाखोंचं पॅकेज नाकारलं; सोलापूरच्या नव्या सीईओंचा थक्क करणारा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:30 IST2026-04-16T15:27:44+5:302026-04-16T15:30:59+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांची नियुक्ती झाली आहे.

झेंडावंदनाचं स्वप्न अन् मायक्रोसॉफ्टचं लाखोंचं पॅकेज नाकारलं; सोलापूरच्या नव्या सीईओंचा थक्क करणारा प्रवास!
CEO Kushal Jain: नव्याने आलेले सीईओ कुशल जैन यांची निवड प्रतिष्ठित 'मायक्रोसॉफ्ट' कंपनीत झाली. मात्र, दीड वर्ष तिथे काम केल्यानंतर त्यांना जाणीव झाली की, केवळ पगारापेक्षा लोकांची कामे करण्यात आणि त्यांच्या सेवेत त्यांना अधिक समाधान मिळेल या आशेने २०१८ मध्ये त्यांनी या ध्येयाने प्रेरित होऊन आयएएस होण्यासाठी तयारी सुरू केली अन् २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
कुशल जैन हे २०२१च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून ४०वा क्रमांक पटकावला होता. ते मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी बंगळुरू येथील आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केली आहे. नागरी सेवा परीक्षेत यश मिळवण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये दीड वर्ष काम केले, त्यानंतर त्यांनी यूपीएसची तयारी करून ते पास झाले.
आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्र...
सुरुवातीला त्यांना आंध प्रदेश कॅडर मिळाले होते. मात्र, २०२३ मध्ये त्यांनी महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी वृष्टी जैन यांच्याशी विवाह केल्यामुळे 'आंतर-कॅडर बदली'द्वारे महाराष्ट्र कॅडर निवडले. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, अहेरी म्हणून कार्यरत आहेत.
शाळेतच पाहिले स्वप्न..
प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्यदिनी शाळेत येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पाहून, 'आपल्या हस्तेही कधीतरी असेच झेंडावंदन व्हावे,' असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांना उत्तर मिळाले होते की, 'यासाठी खूप अभ्यास करावा लागतो.' तोच धागा पकडून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि आज ते त्याच सन्माननीय पदापर्यंत पोहोचले आहेत.
दररोज पेपर वाचणं चांगलं..
प्रत्येकानं दररोज पेपर वाचावे असं मला वाटतं. दररोज वर्तमानपत्र वाचणे अत्यंत चांगले आणि फायदेशीर आहे. यामुळे देश-विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळते. सामान्यज्ञान वाढते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.