शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे पालकांच्या पाठी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:12 PM2019-11-22T13:12:21+5:302019-11-22T13:15:15+5:30

ओझ्याची आई-वडिलांना चिंता; मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी व्यक्त केली काळजी

The burden of schoolchildren on the back of parents ...! | शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे पालकांच्या पाठी...!

शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे पालकांच्या पाठी...!

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे केलेल्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होतीशासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजनाचे दप्तर शाळेमध्ये घेऊन जावे लागण्याचे या सर्वेक्षणातून समोर आले

सोलापूर : सध्याच्या डिजिटल युगातही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झाल्याचे दिसत नाही. रोजच्या वह्या, पुस्तके यासोबत डबा व पाण्याची बाटली, यामुळे दप्तराचे वजन वाढलेलेच आहे. शासन स्तरावरून प्रयत्न करूनही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी झालेले नाही.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे केलेल्या सर्वेक्षणात ७७ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. शासनाने नियम तयार करून निश्चित केलेल्या वजनापेक्षा २ ते ३ किलो अधिक वजनाचे दप्तर शाळेमध्ये घेऊन जावे लागण्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. अनेक पालकांनी दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना त्रास होत असल्याचे सांगितले. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असली तरीही विद्यार्थी पाण्याची बाटली सोबत ठेवतात. यामुळे दप्तरासोबत इतर वस्तूंचेही वजन वाढते.

जे विद्यार्थी शाळेनंतर खासगी शिकवणीला जातात त्यांना दप्तराच्या वजनाचा जास्त त्रास होतो. शिकवणीसाठीच्या वेगळ्या वह्या दप्तरात ठेवलेल्या असतात. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी रिक्षा किंवा स्कूल बस लावलेली असते. विद्यार्थी शाळेनंतर शिकवणी करूनच घरी येतो. सकाळी ७.३० वाजता बाहेर गेलेला विद्यार्थी शिकवणी करूनच संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता घरी येतो. यामुळे पालक विद्यार्थ्यांना दोन वेळचा डबा देतात. शाळा आणि शिकवणी, यामुळे दमलेल्या विद्यार्थ्याला डब्याच्या वजनामुळे अधिक त्रास होत असल्याचे एका पालकाने सांगितले.

दप्तरात काय असते?
- समितीकडे आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक ते पाच किलो वजनाचे दप्तर असल्याचे दिसून आले. यामध्ये साडेतीन किलो वजनाची शालेय पुस्तके, अडीच किलो वजनाच्या वह्या, एक किलो वजनाचा डबा, एक किलो पाण्याची बाटली, ९१ टक्के शाळेतील विद्यार्थी वेळापत्रकानुसार पुस्तके घेऊन वर्गात जातात. वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी ७६.३ टक्के शाळांनी लॉकर उपलब्ध करून दिले.

माझी मुलगी पहिलीमध्ये शिकत असून, तिला सोडायला मी गाडीवरून जातो. शाळेमध्ये जेवढे सांगतात तितकीच पुस्तके व वह्या आम्ही तिच्या दप्तरात देतो. तिला वजन होऊ नये, यासाठी शाळेच्या गेटपर्यंत सोडत असतो. शाळा सुटल्यानंतर ती गेटच्या बाहेर आली का दप्तर माझ्याकडेच देते.
 - स्वप्निल ओहोळ, पालक.

एखादा विद्यार्थी रोज सगळीच वह्या, पुस्तके सोबत घेऊन जात असेल तर दप्तराचे वजन वाढतेच. माझी मुलगी सातवीमध्ये शिकते. शाळेत रोज जितके तास असतात त्याप्रमाणे ती वह्या व पुस्तके घेऊन जाते.
- सूर्यमणी गायकवाड, पालक

कपाटामुळे सोय...
- मार्कंडेय नगर येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये येणाºया मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वर्गात एक कपाट ठेवण्यात आले आहे. या कपाटामध्ये जास्तीची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आपली पुस्तके घरातच ठेवण्यास सांगण्यात आले आहे, तर शाळेमध्ये असणारी पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाची व्यवस्था क रण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरून डबा आणण्याची गरज नसते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झाले आहे.

Web Title: The burden of schoolchildren on the back of parents ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.