Konkan Rain: तळकोकणला वादळी पावसाने झोडपले; शेतकरी, बागायतदार चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:43 IST2026-03-27T12:42:43+5:302026-03-27T12:43:21+5:30
Konkan Unseasonal Rain: वैभववाडीला गारपिटीसह अवकाळीचा तडाखा

Konkan Rain: तळकोकणला वादळी पावसाने झोडपले; शेतकरी, बागायतदार चिंतेत
वैभववाडी : तालुक्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा आला असला, तरी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः निमअरुळे परिसरात विजेचे सहा खांब आणि ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने सडुरे खोऱ्यातील अनेक गावे अंधारात बुडाली आहेत.
दुपारी ३ वाजेपर्यंत कडक ऊन असताना अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि सव्वाचारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लोरे, आचिर्णे, कुर्ली, खांबाळे, नावळे, सडुरे तसेच वैभववाडी शहरात सुमारे पाऊण तास पाऊस सुरू होता. या वादळामुळे करुळ येथील अनंत पांचाळ यांच्या घराचे छप्पर उडून नुकसान झाले आहे.
वीज यंत्रणा कोलमडली, पाच गावे अंधारात
वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका निमअरुळे गावाला बसला. येथे विजेचा मुख्य ट्रान्सफॉर्मर आणि सहा खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे निमअरुळे, अरुळे, सडुरे, शिराळे आणि कुर्ली या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
आंबा-काजूसह रब्बी पिकांवर संकट
बदलत्या हवामानामुळे आधीच अडचणीत असलेल्या बागायतदारांच्या चिंतेत या गारपिटीने भर पडली आहे. तालुक्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांवरही या अवकाळीचा जबरदस्त परिणाम होणार असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
लांजा, राजापूर तालुक्यांत गारांसह पाऊस
लांजा/राजापूर : वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढलेले असतानाच गुरुवारी दुपारी अचानक लांजा तालुक्यासह राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. अचानक काेसळलेल्या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांची धावाधाव झाली.
लांजा तालुक्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास काेसळलेल्या पावसामुळे हवेत काहीसा गारवा आला हाेता. पावसाच्या शक्यतेने नागरिकांची जनावरांसाठी जमा केलेली वैरण, पावसाळ्यात जाळण्यासाठी लागणारी लाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच घर बांधणीसाठी आणलेल्या सिमेंटच्या पाेत्यांवर आवरण टाकण्यासाठी धावपळ उडाली होती. पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसाेय झाली. पण, पावसाने विश्रांती घेताच पुन्हा मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली हाेती.
राजापूर तालुक्यातील ओणी, वाटूळ, जांभवली आदी गावांमध्ये पावसासोबत गारांचा मारा झाला. गारांच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून, कच्च्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या तोंडावरच बागायतदारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागात वीजपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शेतकरी, बागायतदार चिंतेत
या अवकाळी पावसामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यांतील शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडले आहेत. मोठ्या नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांना गारांचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संगमेश्वरात पावसाची हजेरी
संगमेश्वर तालुक्यातील आरवली, संगमेश्वर, बुरंबी, कोसुंब, देवरुख, मोर्डे, साखरपा, आंगवली या परिसरात दुपारी ३:३० वाजण्याच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली हाेती. अचानक काेसळलेल्या पावसामुळे या भागातीलही आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.