वाळू माफियांचा 'खेळ खल्लास', प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राईक' खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 18, 2026 14:24 IST2026-04-18T14:22:28+5:302026-04-18T14:24:44+5:30
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचा दणका

वाळू माफियांचा 'खेळ खल्लास', प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राईक' खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विशेष धोरण आखले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना समन्वयाने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. यात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे सचिन पाटील यांच्या पथकांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली.
मोहिमेची व्याप्ती इतकी मोठी होती की, जिल्हा प्रशासनाने सर्व मार्गांवर एकाच वेळी धडक दिली. रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे ३ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपली वाहने आणि वाळू वाटेतच सोडून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः झाराप परिसरात उपस्थित राहून या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला. या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून, ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही कारवाई आता जिल्ह्यासाठी एक 'रोल मॉडेल' ठरली आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या संयुक्त आणि गुप्त कारवाया सातत्याने राबवून कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्याचा ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
चौकट
कारवाईचा आकडा: १५ वाहने जप्त
विविध तालुक्यांतील संयुक्त पथकांनी केलेल्या कारवाईत: आचरा-कणकवली मार्ग (२), देवली-परुळे (३), कुंभारमाठ (३), तोंडवली (३) आणि कुडाळ परिसर (४) अशा एकूण १५ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
समन्वयाची ताकद
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या पथकांनी (सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ) अभूतपूर्व समन्वय साधत ही मोहीम यशस्वी केली.
चौकट
मोहिमेची गोपनीयता
'सर्जिकल स्ट्राईक'च्या धर्तीवर या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळली होती. रात्रीच्या वेळी एकाच वेळी अनेक ठिकाणी धडक दिल्याने वाळू तस्करांना सावरण्याची संधी मिळाली नाही. अनेक ठिकाणी वाहने सोडून आरोपींनी पळ काढला.
प्रशासनाचा स्पष्ट इशारा
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः झाराप येथे भेट देऊन आढावा घेतला. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध आता 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबले जाणार असून, यापुढेही अशा प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.