मांड उत्सवास भाविकांची मांदियाळी

By Admin | Updated: January 12, 2015 00:58 IST2015-01-12T00:53:13+5:302015-01-12T00:58:33+5:30

पेंडुरात १४ दिवस कार्यक्रम : मंदिरात खण, नारळ, केळ्यांची रास

Mandakya celebrated the festival | मांड उत्सवास भाविकांची मांदियाळी

मांड उत्सवास भाविकांची मांदियाळी

चौके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे आराध्य दैवत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरीचा त्रैवार्षिक मांड उत्सव सध्या सुरु आहे. पेंडूर गावातील १४ दिवसांच्या या मांड उत्सवाला राज्यभरातून अनेक भाविकांनी हजेरी लाऊन देवतांचे दर्शन घेतले. या उत्सवामध्ये वेताळ व सातेरी मंदिरात खण, नारळ व केळी यांची मोठी रास जमा झाली आहे.
दरम्यान, पेंडूर गावच्या या त्रैवार्षिक मांड उत्सवानिमित्त शनिवारी रात्री श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी मंदिर व आजूबाजूचा परिसर याठिकाणी लक्षदीप सोहळ्याचे आयोजन मांड उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी रात्री श्री देव वेताळ व श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले.
यावेळी खासदार राऊत यांच्या हस्ते मंदिरात दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला. देवस्थान समितीच्यावतीने अध्यक्ष जयराम सावंत यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मांड उत्सव समितीचे खजिनदार लक्ष्मण परब, गणपत परब, उत्तम परब, संतोष परब, रामचंद्र सावंत, प्रदीप सावंत, सुरेश सावंत, पेंडूर शिवसेना शाखाप्रमुख रामू सावंत, उपशाखाप्रमुख बाबू कांबळी, तालुकाप्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक अशोक पटेल आदी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Mandakya celebrated the festival