मित्राला घेवून साताऱ्यातील विवाह सोहळ्यासाठी निघाला, ल्हासुर्णेजवळ भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:04 IST2025-11-24T17:02:57+5:302025-11-24T17:04:12+5:30
दुसरा गंभीर : महामार्गावरील निकृष्ट कामाचा ठरला बळी

मित्राला घेवून साताऱ्यातील विवाह सोहळ्यासाठी निघाला, ल्हासुर्णेजवळ भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला
कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर ल्हासुर्णे गावच्या हद्दीत रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. कार आणि दुचाकीची झालेली समोरासमोर धडक ही या महामार्गावरील निकृष्ट कामामुळे झालेला पंधरवड्यातील दुसरा अपघात आहे.
वैष्णव रामचंद्र काटकर (रा. ललगुण, ता. खटाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित आणि सर्वपरिचित नाव असलेला युवक आहे. साताऱ्यातील विवाह सोहळ्यासाठी तो निघाला होता. त्याच्यासोबत शिरंबे येथील मित्र गौरव सुनील यादव होता. मुगाव फाटा ओलांडताच भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की वैष्णवचा जागीच मृत्यू झाला, तर गौरव गंभीर जखमी झाला.
धडक होताच परिसरातील नागरिक धावून आले. शिरंबे गावात माहिती पोहोचताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. कोरेगाव पोलिसांनीही तातडीने धाव घेत दोघांनाही सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैष्णव याला मृत घोषित केले. जखमी गौरव यादव याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या महामार्गावर करण्यात आलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.गेल्या आठवड्यात याच पट्ट्यात कारने विद्यार्थिनीला चिरडले होते. त्या ठिकाणापासून आजचा अपघात केवळ एक किलोमीटरवर झाला आहे. मग कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार? ठेकेदार कंपनी महामार्ग नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासाठीच बांधते का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुपरवायझरपासून ठेकेदारापर्यंत सर्वांची चौकशी करा..
शिरंबे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सुपरवायझरपासून ठेकेदारापर्यंत सर्वांची चौकशी करून महामार्गाची तत्काळ तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. . निकृष्ट कामामुळे जीव गेले तर याचा हिशेब राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना द्यावा लागेल, असा इशारा हभप नामदेवराव भोसले यांनी दिला आहे.