शोषण रोखण्यासाठी जादूटोणा कायदा

By Admin | Updated: December 2, 2014 23:37 IST2014-12-02T21:35:58+5:302014-12-02T23:37:12+5:30

श्याम मानव : नरेंद्र दाभोलकरांचाही या कायद्यासाठी पाठपुरावा

Witchcraft Act to Prevent Exploitation | शोषण रोखण्यासाठी जादूटोणा कायदा

शोषण रोखण्यासाठी जादूटोणा कायदा

सातारा : जादूटोणा विरोधी कायद्याचा कुठल्याही देवाधर्माला विरोध नाही. परंतु देवाधर्माच्या नावाने होणारी सर्वसामान्यांची लुबाडणूक आणि शोषण रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती’चे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले.
सामाजिक न्याय विभागातर्फे जादूटोणा अर्थात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३’अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ’जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीद्वारे येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त उमेश घुले, समाज कल्याण अधिकारी स्वाती इथापे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. सांळुंखे, प्रा. विलास खंडाईत, सुरेश झुरमुरे, प्रवीण गांगुर्डे आदी उपस्थित होते.
जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्याची प्रक्रिया, त्यासाठीचा पाठपुरावा आणि आवश्यकतेबाबत प्रा. मानव यांनी तपशीलवार विवेचन केले. या कायद्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी बराच पाठपुरावा केल्याचे सांगून प्रा. मानव म्हणाले, भारतीय राज्य घटनेने प्रत्यकाला उपासना आणि धर्म स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणाच्याही श्रद्धेविरुध्द हा कायदा नाही. या कायदाचा केवळ अपप्रचार करण्यात आला होता. श्रद्धा जोपासण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु श्रद्धेची चिकित्सा न केल्यास तिचे कधी अंधश्रद्धेत रुपांतर होते ते आपल्यालाही कळत नाही. (प्रतिनिधी)

मंत्रतंत्र करणाऱ्यांवर वचक
या कायद्यांतर्गत दोषी व्यक्तीस ६ महिने व ५ हजार रुपये ते ७ वर्ष व ५० हजार रुपयांपर्यंत शिक्षा होऊ शकते. भूत उतरविण्याच्या बहाण्याने कुठलेही अमानुष कृत्य केल्यास तो गुन्हा ठरु शकतो. तथाकथित चमत्कारांच्या प्रयोगाद्वारे आर्थिक प्राप्ती आणि फसवणुकीला आळा घालण्याचे काम हा कायदा करतो. कुत्रा, साप, किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्या ऐवजी मंत्रतंत्रसारख्या उपचारांना प्रोत्साहन देण्याच्या प्रकाराला या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

Web Title: Witchcraft Act to Prevent Exploitation