व्यापाऱ्याचे घर फोडून पाच लाखांची चोरी

By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-27T23:15:51+5:302015-11-28T00:17:47+5:30

प्रतापगंज पेठेतील घटना : कुटुंब देवदर्शनाला गेले असताना चोरट्यांनी मारला डल्ला

Trick house breaks up to five lakhs of theft | व्यापाऱ्याचे घर फोडून पाच लाखांची चोरी

व्यापाऱ्याचे घर फोडून पाच लाखांची चोरी

सातारा : येथील प्रतापगंज पेठेत व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड, तीन मोबाईल आणि तीन चांदीची नाणी असा ऐवज लंपास केला. देवदर्शनास गेलेले कुटुंब गुरुवारी मध्यरात्री परतले, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगंज पेठेत राधिका टॉकीजच्या जवळच सतीश गंगाराम रावखंडे (वय ५८) यांचे ‘गीतसागर’ हे दुमजली घर आहे. तळमजल्यावर तीन आणि पहिल्या मजल्यावर तीन अशा सहा खोल्या आहेत. रावखंडे, त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि नात असे पाचजण तेथे राहतात. रावखंडे यांचा शेंगदाण्याचा व्यापार आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी सव्वासात वाजता रावखंडे कुटुंब सौंदत्तीच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडले. मंगळवारी दर्शन घ्यायचे त्यांनी योजले होते. सौंदत्तीहून ते कोल्हापूरला आले आणि तेथून गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वाबाराला घरी परतले.
मात्र, घराच्या पुढील दरवाजास कुलूप दिसले नाही. आतून कडी घातल्याचे दिसून आले. त्यामुळे सतीश रावखंडे घराच्या मागील बाजूस गेले. मागील दरवाजा उघडा दिसताच घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील खोलीतील लोखंडी कपाट उघडे होते. त्यातील तीन मोबाईल गायब होते. आतील खोलीत असणारे लोखंडी कपाटही त्यांना उघडे दिसले. त्यात व्यापाऱ्यांना देण्यासाठी ठेवलेले पाच लाख रुपये ठेवले होते, तेही चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांच्या पावलांची ठसे त्यांना शोकेससमोरील टीपॉयवर दिसले. त्यामुळे शोकेसची पाहणी केली असता, त्यातील तीन चांदीची नाणी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री उशिरा रावखंडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पाच लाखांची रोकड, दहा हजार पाचशे रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि सातशे रुपये किमतीची चांदीची नाणी चोरीस गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)


शेतीशाळेजवळ
श्वान घुटमळले
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून श्वानपथक बोलावले. श्वानाने रावखंडे यांच्या घराच्या मागील गल्लीपासून बुधवार पेठ, तेथून राधिका रस्ता असा माग काढला. मात्र, छत्रपती प्रतापसिंह शेतीशाळेच्या आसपास श्वान घुटमळले.


चार-पाच महिन्यांपूर्वीच मी शेंगदाण्याचा घाऊक व्यापार सुरू केला आहे. रविवारी पुणे मार्केट बंद असते. तेथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी पाच लाख रुपये मी घरात ठेवले होते. मंगळवारी देवीचे दर्शन व्हावे म्हणून सोमवारी आम्ही निघालो. परतलो तेव्हा पैसे गायब झाल्याचे समजले.
- सतीश रावखंडे, व्यापारी

Web Title: Trick house breaks up to five lakhs of theft