सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:34 IST2026-05-01T17:34:02+5:302026-05-01T17:34:33+5:30
महाराष्ट्र दिनापासून सलग तीन दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई तसेच पुण्यातील चाकरमणी आता आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत.

सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: महाराष्ट्र दिनापासून सलग तीन दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई तसेच पुण्यातील चाकरमणी आता आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. त्यामुळे महामार्ग अक्षरशः जाम झाला. महामार्गावर सकाळपासून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. खेड शिवापूर टोलनाक्यापासून शिरवळपर्यंत वाहतूक कोंडीची परिस्थिती होती. यामुळे प्रवासी हतबल झाले. सुट्टीतील अर्धा दिवस प्रवासातच गेला. त्यामुळे अनेक प्रवासी संतप्त झाले होते. एकाचवेळी महामार्गावर अनेक वाहने आल्याने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
शिरवळपासून पुढे आल्यानंतर खंबाटकी घाटातही वाहतूक संथगतीने सुरू होती. भुईंज पोलीस महामार्गाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कोकणात जाणारे प्रवासी ही या वाहतूक कोंडीत अडकले होते. मुंबई पुणे महामार्गावरही वाहतूक जाम झाली होती. काही प्रवासी तर दोन दोन तास वाहतूक कोंडीत अडकले होते. पुण्यापासून पुढे आल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, असे प्रवाशांना वाटले होते. मात्र खेड शिवापुर टोलनाक्यापासून पुढे साताऱ्यापर्यंत महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने प्रवास करत होती.
परिणामी प्रवाशांना या ठिकाणीही वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावर कुठेही अपघात अथवा वाहतूक कोंडी होईल, असा अडथळा नव्हता. केवळ मोठ्या संख्येने प्रवासी महामार्गावर आल्याने ही कोंडी झाली असल्याचे पोलीस सांगत आहेत. दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.