लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:55 IST2026-05-01T17:52:47+5:302026-05-01T17:55:32+5:30
परभणीत यवतमाळच्या अल्पवयीन बालिकेचा विवाह चाईल्ड हेल्प लाईन आणि पोलिसांनी रोखला.

AI Generated Image
राजन मंगरूळकर
परभणी : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ परभणी या टोल फ्री नंबरवर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता गोपनीय माहिती मिळाली होती. यवतमाळ जिह्यातील अपल्वायीन बालीकेचा बालविवाह परभणी शहरात होणार आहे. हा बालविवाह चाईल्ड लाईन हेल्पलाइन पथकासह नानलपेठ पोलीस आणि महिला, बालविकास विभागाने रोखला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तत्काळ बालीका रहिवाशी असलेल्या गावातून ग्रामपंचायत येथील जन्म नोंद याची मागणी करून त्याच्या आधारे खात्री करण्यात आली. ही बालीका १७ वर्ष ६ महिने वयाची आहे आणि ज्या मुलासोबत लग्न होणार होते त्याचे वय २४ वर्ष असल्याचे निष्प्पण झाले. त्यावरून परभणी शहरातील नानलपेठ ठाण्यात हद्दीतील मल्हारनगर याठिकाणी मुलाच्या राहते घरी बालविवाह होणार असल्याने नानलपेठचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना घटनेची माहिती देण्यात आली.
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी नागरी मिलिंद वाघमारे यांना माहिती देण्यात आली. ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मोनिका रंधवे यांच्या मार्गदर्शनात चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे, सुपरवायझर सय्यद इशरत, केस वर्कर बाळू गुंडे, अंगणवाडी सेविका एस.के. वाळवंटे, नानलपेठचे पीएसआय बुधोडकर, एच.एस. मरगळ, जमादार बी.के. लिंगायत यांनी होणार बाल विवाह मुलाच्या राहते घरी जाऊन समुपदेशनातून रोखला. तसेच बालिकेच्या पुढील काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने तीस बाल कल्याण समिती परभणी यांचे समक्ष हजर करण्यात आले.