विधिमंडळाबाहेर महेश शिंदे-जयकुमार गोरे यांची 'जादुकी झप्पी', राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:03 IST2026-03-24T18:02:31+5:302026-03-24T18:03:12+5:30
भाजप मंत्र्यांशी दाखवलेली जवळीक भुवया उंचावणारी ठरली

विधिमंडळाबाहेर महेश शिंदे-जयकुमार गोरे यांची 'जादुकी झप्पी', राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला संघर्ष आता विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे. मात्र, या सर्व राजकीय धामधुमीत एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांची विधिमंडळ परिसरात झालेली गळाभेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
एकाबाजूला जिल्हा परिषदेत पक्षाचे दोन सदस्य फुटल्याने शिंदेसेना घायाळ झाली असताना, दुसरीकडे पक्षाच्याच आमदाराने भाजप मंत्र्यांशी दाखवलेली जवळीक भुवया उंचावणारी ठरली.
जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनी भाजपकडून निवडणूक लढवून अध्यक्षपद पटकावले. मात्र, या निवडीदरम्यान शिंदेसेनेचे दोन सदस्य फुटल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गंभीर प्रकाराबाबत विधिमंडळात खंत व्यक्त केली आहे.
असे असतानाही, महेश शिंदे यांनी या सर्वांचे खापर थेट पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर फोडत आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर, विधिमंडळातून बाहेर पडताच जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे यांची चक्क गळाभेट घेऊन स्मितहास्य केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे साताऱ्याच्या राजकारणात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
महेश शिंदे नक्की कोणाचे?
सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्याचे विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यात कलगी तुरा पाहायला मिळाला. या सर्व घडामोडी घडत असताना आमदार महेश शिंदे हे मंत्री गोरे यांची गळाभेट घेताना दिसले. या भेटीवरुन महेश शिंदे हे शिंदेसेनेचे आमदार आहेत की भाजपचे, असा खोचक सवाल राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.