"दोन मतं कमी करण्यासाठी...", पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:58 IST2026-03-23T12:47:57+5:302026-03-23T12:58:31+5:30

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला

Following the ruckus at the Satara Zilla Parishad DCM Eknath Shinde expressed his outrage in the Legislative Assembly | "दोन मतं कमी करण्यासाठी...", पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं

"दोन मतं कमी करण्यासाठी...", पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं

Eknath Shinde on Satara Zilha Parishad Clash: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेला राडा आणि पालकमंत्र्यांना झालेली धक्काबुक्की यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी भयानक स्थिती पाहायला मिळाली," अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. दुसरीकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीचे पडसाद विधानसभेत उमटले. जिल्हापरिषदेच्या दोन मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली. यात ते जखमी झाले. त्यानंतर सोमवारी विधानसभेत यावरुन जोरदार राडा झाला.

दोन मतदारांवर जुन्या काळातील गुन्हा दाखल केला - एकनाथ शिंदे

"साताऱ्यात जे झालं त्याचा मी देखील साक्षीदार आहे. कारण या निवडणुकीची तारीख जाहीर झाली त्यावेळी शंभूराज देसाईंनी मला फोन केला. मकरंद देसाईही तिथे होते. त्यांनी सांगितले की दोन मतदारांवर जुन्या काळातील गुन्हा काल दाखल केला आहे. त्यानंतर मी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना फोन केला. त्यांनी सांगितले की गुन्हा दाखल झालेला आहे. मी त्यांना एकच सांगितले की उद्या मतदान आहे. मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही. पोलीस अधिक्षकांनी असं काही होणार नाही असं सांगितले. ते मतदान करतील असं पोलीस अधिक्षकांनी सांगितले. त्यानंतर मी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन केला. त्यांना सांगितलं की मला थोडी शंका आहे की साताऱ्याचे पोलीस अधिक्षक हे दोन मतं कमी करण्यासाठी आणि निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काहीतरी प्रकार होऊ शकतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मंत्र्यांना आरोपीला पकडतात तसं पकडून घेऊन गेले

"पोलीस महासंचालकांनी तुषार दोषींना फोन केला. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी मला फोन करुन तुषार दोषी असं काही होऊ देणार नाही असं सांगितले. त्यानंतर मी पोलीस महासंचालकांना सांगितले की तुमचे लोक गेटवर उभे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सूचना द्या आणि मतदान झाल्यानंतर कारवाई करा. ते म्हणाले असं काही होणार नाही. परंतु तिथे जे घडले ते माध्यमांमध्ये पाहिले, शंभूराज देसाईंनी सांगितले. मंत्री तिथे गेले पण ते सीमारेषेच्या बाहेर होते. पोलिसांनी मंत्री आमदार पदाधिकारी कुणालाच बघितलं नाही. आरोपीला पकडतात तसं पकडून घेऊन गेले. पोलिसांनी दोन मतदारांना पकडून नेलं. त्यानंतर मी पुन्हा पोलीस महासंचालकांना फोन केला. त्यांनी सांगितले असं काही होणार नाही पण मी म्हटलं तिकडे निवडणूक पार पडतेय. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी स्थिती पाहायला मिळाली," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

"उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तूस्थिती सांगितली त्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे समोर येईल त्याआधारावर कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलीस अधीक्षकांचे निलंबन

यापूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची शक्यता आहे.

राजकीय भूकंप?

एकनाथ शिंदेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला भाजपचा विजय झाला असला तरी, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे मंत्री जखमी झाल्याने महायुतीमधील अंतर्गत तणाव वाढला आहे.

Web Title : सतारा जिला परिषद संघर्ष में शिंदे ने पुलिस पर पक्षपात का आरोप लगाया।

Web Summary : शिंदे ने सतारा जिला परिषद चुनाव में पुलिस पर विरोधियों का पक्ष लेने का आरोप लगाया, जिससे मंत्रियों के खिलाफ हिंसा हुई। फडणवीस ने जांच का वादा किया। एसपी निलंबित।

Web Title : Shinde accuses police of bias in Satara Zilla Parishad clash.

Web Summary : Shinde alleges police favored opponents in Satara Zilla Parishad election, leading to violence against ministers. Fadnavis promises investigation. SP suspended.