खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज : जिल्हाधिकारी

By Admin | Updated: July 4, 2014 00:33 IST2014-07-04T00:30:45+5:302014-07-04T00:33:22+5:30

३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप

Crop loan of 669 crores for Kharif: Collector | खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज : जिल्हाधिकारी

खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज : जिल्हाधिकारी

सातारा : खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज वाटपास प्राधान्य दिले असून, आत्तापर्यंत बँकांनी खरिपासाठी ६६९ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, जिल्हा अग्रणी बँकेने या वर्षीसाठी तयार केलेल्या पतपुरवठा आराखड्याच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ३६१४.४८ कोटींचे कर्जवाटप प्राथमिकता क्षेत्रासाठी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
जिल्हा अग्रणी बँकेच्या बँकर्स समन्वय समितीची बैठक नियोजन भवनात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. होते. ‘आरबीआय’चे सहायक महाप्रबंधक मोहन सांगवीकर, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक जी. के. साळवेकर, महाबँकेचे महाप्रबंधक रवींद्र चव्हाण, अग्रणी बँक व्यवस्थापक संजय वाघ, प्रकल्प संचालक गिरीश भालेराव, जिल्हा बँकेचे उपमहाव्यवस्थापक भुजंग जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘गेल्यावर्षी अग्रणी बँकेने ४२८४.१३ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच व्यापारी बँकांद्वारे ३६१४.४८ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. शेती क्षेत्रासाठी २५२६.१४ कोटी, उद्योगासाठी २३८.१० कोटी त्याचबरोबर अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी ८५०.२४ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात व्यापारी बँकांमार्फत २१८९.१७ कोटी, जिल्हा बँक १४२१.१७ कोटी, ‘आरआरबी’च्यावतीने ४.१३ कोटींच्या कर्जपुरवठ्याचा समावेश आहे.
गिरीश भालेराव यांनी नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व कुटुंबांचे ‘एक कुटुंब एक खाते’ योजनेत खाते उघडण्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील बँकांनी १२९० बचतगटांना १४.५९ कोटींचे अर्थसहाय्य केले.
यावेळी आनंद कटके, भुजंग जाधव, अनिल गोडबोले, ‘आरसेटी’चे राज्य समन्वयक सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध बॅँकांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Crop loan of 669 crores for Kharif: Collector