Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:40 IST2025-11-26T13:39:53+5:302025-11-26T13:40:50+5:30
कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले

Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ
फलटण (जि. सातारा) : बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या टाकीत पडून साडेतीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी फलटण तालुक्यातील सरडे येथे घडली. मन्वित बापू भोसले असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
दत्तात्रय करडे यांनी सरडे गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते. शौचालयात सात फुटी खोल टाकी बांधण्यात आली होती. सोमवारी चारच्या सुमारास मन्वित खेळत टाकीजवळ गेला. शौचालयाच्या दरवाजामधून तो थेट टाकीत पडला.
कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले. स्थानिक तरुणाने टाकीतून त्याला बाहेर काढले आणि पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फलटण येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांचा पळ
घटनेची माहिती मिळताच दत्तात्रय करडे कुटुंबीयांनी गावातून पळ काढला मन्वितचा मृतदेह गावात आणल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. गावचे पोलिस पाटील मनोज मोरे, सरपंच मंदा करडे यांना घटनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सरडे, ग्रामपंचायतीकडून संबंधित बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
घटनेची नोंद नाही
घटना घडून चोवीस तास झाले तरी घटनेची आकस्मिकमध्ये नोंद नाही. बीट हवालदार शांतीलाल ओंबासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची नोंद नाही बालकावर अंत्यसंस्कार झाले असून, पुढे योग्य ती कार्यवाही करू, असे त्यानी सांगितले.
...अन्यथा बांधकाम पाडणार
ग्रामपंचायतीकडून संबंधित बांधकामांवर कारवाई न झाल्यास आम्ही बांधकाम पाडणार, असे मन्चितच्या कुटुंबीयांनी सांगितले सोमवारी रात्री मन्वितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.