वाहनाने ठोकरल्याने औंधची शिक्षिका ठार

By Admin | Updated: November 6, 2015 23:37 IST2015-11-06T23:30:02+5:302015-11-06T23:37:00+5:30

वडूज-गोपूज रस्त्यावर अपघात : शाळेला जाताना काळाचा घाला

Aundh teacher killed by vehicle stab | वाहनाने ठोकरल्याने औंधची शिक्षिका ठार

वाहनाने ठोकरल्याने औंधची शिक्षिका ठार

वडूज : येथील प्राथमिक शिक्षिका सुरेखा विलास मोरे-खराडे या दुचाकीवरून शाळेला येत असताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. औंध येथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य विलास मोरे यांच्या त्या पत्नी होत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा मोरे-खराडे (वय ४७ मूळगाव चरेगाव, ता. कऱ्हाड) या वडूज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्या दररोज औंध ते वडूज हा प्रवास दुचाकीवरून करत होत्या.
शुक्रवारी सकाळी साडेनऊला नेहमीप्रमाणे त्या वडूजला येण्यासाठी निघाल्या. गोपूजमार्गे जात असताना भावलिंग मंदिराजवळच्या रस्त्यावर त्या आल्या असताना त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने ठोकरले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी उपप्राचार्य विलास मोरे यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरेखा मोरे यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
सुटीच्या एका दिवसापूर्वीच मृत्यू...
सुरेखा मोरे यांनी १९८६ मध्ये कोयनानगर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून प्रारंभ केला. त्यानंतर त्या अनेक वर्षे खटाव तालुक्यातील औंध, त्रिमली, जायगाव, वडूज येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळांना शनिवार, दि. ७ पासून दिवाळीची सुटी लागणार होती. मात्र, सुटी लागण्याच्या एक दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: Aundh teacher killed by vehicle stab