आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर डाळिंब क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:30+5:302021-08-26T04:29:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लक्ष्मण सरगर आटपाडी : माणदेशातील माळरानावर कमी पावसाच्या पाण्यावर येणारे तसेच हमखास पैसे मिळवून देणारे डाळिंब ...

Thousands of hectares of pomegranate area in Atpadi taluka on the verge of extinction | आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर डाळिंब क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर

आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर डाळिंब क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्क

लक्ष्मण सरगर

आटपाडी : माणदेशातील माळरानावर कमी पावसाच्या पाण्यावर येणारे तसेच हमखास पैसे मिळवून देणारे डाळिंब क्षेत्र सध्या संकटात आहे. आटपाडी तालुक्यातील हजारो हेक्टर डाळिंब क्षेत्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून नव्याने डाळिंबावर आलेल्या तेल्या, करपा व कुजवा या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांना बागा सोडून द्याव्या लागल्या आहेत.

माणदेशातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, पंढरपूर, माण, खटाव, सांगोला, माळशिरस या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड केली जाते. कमी खर्चात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड केली आहे. विशेषतः युवा शेतकरी डाळिंब शेतीकडे आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. आटपाडी तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळिंबावर वेगवेगळ्या रोगाने अतिक्रमण केले आहे. औषध फवारणी करूनही बागा वाचवणे कठीण बनले आहे. फळ तर झाडाला शिल्लक राहिलेच नाही; मात्र झाड वाचविण्यासाठी पराकाेटीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

दुष्काळी भागात सरासरी ४०० ते ४५० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र २०१८-१९ मध्ये ९५० मिलिमीटर, तर २०१९-२० मध्ये १००० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस जास्त झाल्यामुळे आर्द्रता वाढते. परिणामी तेलकट, पाकळीकुज, डांबऱ्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे कुजवा रोग सुरू झाला असून, त्यामध्ये फूल कुजवा व तयार होणारे डाळिंब फळच कुजत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

चौकट

शेतकऱ्याने घातलेला खर्च निघणेही मुश्किल होऊन बसले आहे. लहरी निसर्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. पीक विम्याबाबत शासनाने निश्चित धोरण ठरवले तरच शेतकरी वाचू शकेल.

- गौरीहर पवार,

डाळिंब बागायतदार शेतकरी

चाैकट

एक हेक्टर डाळिंबासाठी येणार अंदाजित खर्च

(झाडे अंदाजे १००० ते ११००)

शेणखत १० ट्रॉली × १५००० : १ लाख ५० हजार रुपये

वरखत लिक्विड खताचा डोस १ हेक्टरसाठी : ९० हजार रुपये

कीटकनाशके, बुरशीनाशक, टॉनिक खर्च : १ लाख रुपये

एक हेक्टरला अंदाजित खर्च : ३ लाख ४० हजार रुपये

Web Title: Thousands of hectares of pomegranate area in Atpadi taluka on the verge of extinction