खड्डे बुजविता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देत आहेत, काँग्रेस-महाआघाडीतील नेत्यांवर पडळकरांची उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:07 IST2026-05-18T18:03:44+5:302026-05-18T18:07:11+5:30

'नावालाच अर्थमंत्री होते, सध्या अर्थ नसलेली विधाने करीत आहेत'

The potholes could not be filled they are advising Modi Gopichand Padalkar's ironic criticism of the leaders of the Congress, Grand Alliance | खड्डे बुजविता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देत आहेत, काँग्रेस-महाआघाडीतील नेत्यांवर पडळकरांची उपरोधिक टीका

खड्डे बुजविता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देत आहेत, काँग्रेस-महाआघाडीतील नेत्यांवर पडळकरांची उपरोधिक टीका

सांगली : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीसह सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यावर काहीजण मोदींना लांबलचक पत्र लिहीत आहेत. काही स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ टीका करीत आहेत. काँग्रेस-महाआघाडीतील नेतेही आरोप करीत आहे. ज्यांना रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत ते आता मोदींना सल्ला देत असल्याची उपरोधिक टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केली.

येथील मारुती चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक-शेतकरी-कष्टकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. पडळकर बोलत होते. व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक मनोज सरगर, सागर खोत, नगरसेवक उदय बेलवलकर, अनिता पवार, समाजकल्याण समिती सभापती गीता पवार, विश्वजित पाटील, उदय मुळे, रवींद्र वदवणे, शरद देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, सोने खरेदी करू नका, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, इंधन बचत करा, परदेश दौरे टाळा असे आवाहन मोदींनी केले. यात विरोधकांना काय अडचण आहे. यापूर्वीही देशावर संकट आल्यानंतर जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केले होते. तेव्हा कुणी त्यावर प्रश्न उपस्थित केला नव्हता. अनेक देशात इंधनाचे दर वाढले आहेत. या देशांच्या तुलनेत भारतात इंधनाचे दर तितके वाढलेले नाहीत. मोदींची भूमिका राष्ट्रहिताची असून, यात मताच्या राजकारणाचा विषय नाही. याबाबत अफवा पसरविणाऱ्यांना जशात तसे उत्तर दिले जाईल. लोकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशाराही दिला.

सदाभाऊ खोत म्हणाले की, मोदींनी देशाला संकटात टाकले नाही. हे पाप काँग्रेसचे आहे. सत्तेचे डोहाळे लागलेली मंडळी मोदींच्या आवाहनावर टीका करीत आहेत. पण या देशातील शेतकरी या संकटातही लोकांच्या ताटातील घास कमी पडू देणार नाही. शेतकरीच देश वाचवू शकतो. गावगाड्यातील लोक मोदींच्या पाठीशी आहेत. काही जणांना मोदी नावाची ॲलर्जी झाली आहे, अशी टीका केली.

यावेळी सागर खोत, पृथ्वीराज पवार यांची भाषणे झाली. नगरसेविका मनीषा कुकडे, माजी महापौर नितीन सावगावे, फारूक जमादार, सतीश नीळंकठ, विजय साळुंखे, उदय मुळे, शलाका पवार, आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांच्यावर निशाणा

या परिषदेत गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज पवार, सागर खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सागर खोत यांनी तर सर्वोदय साखर कारखान्याचा विषय व्यासपीठावरून मांडत पडळकर यांना साद घातली. सांगली-पेठ रस्ता पूर्ण करायला जमले नाही ते भाजपवर टीका करीत असल्याचे सांगत पवार यांनी जयंतरावांना टार्गेट केले, तर पडळकर यांनी नावालाच अर्थमंत्री होते, सध्या अर्थ नसलेली विधाने करीत आहेत, असा टोला लगाविला.
चौकट

ट्रम्पला मोदी ढाक लावतील...

नरेंद मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांना घाबरतात, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. त्याचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. खरा पैलवान हा डावात आल्यावर ढाक लावून समोरच्याला चितपट करतो. तसेच मोदी हेही कधी तरी ट्रॅम्प यांना ढाक लावतील, असे म्हणताच हशा पिकला.

घोडागाडीतून कार्यक्रमस्थळी

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी इंधन बचतीचा संदेश देत आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे घोडागाडीतून मारुती चौकातील कार्यक्रमस्थळापर्यंत आले.

Web Title : खड्डे नहीं भर पाए, मोदी को सलाह: विपक्षी पर पडसलकर का कटाक्ष।

Web Summary : गोपीचंद पडसलकर ने ईंधन संरक्षण पर मोदी को सलाह देने वाले विपक्षी नेताओं की आलोचना की। उन्होंने राष्ट्रीय हित और अतीत के नेताओं के उदाहरणों का हवाला देते हुए मोदी की अपील का बचाव किया। मोदी की नीतियों का विरोध करने पर विपक्ष की आलोचना की गई।

Web Title : Padsalkar slams opposition for criticizing Modi despite failing at basic governance.

Web Summary : Gopichand Padsalkar criticized opposition leaders for advising Modi on fuel conservation while failing to fix potholes. He defended Modi's appeal for fuel saving, citing national interest and past leaders' examples. Opposition criticized for opposing Modi's policies.