Sangli: मदन, तुझा अन् माझा स्वभाव जुळतो, तू माझ्यासोबत ये!, अजितदादांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:19 IST2026-01-29T17:16:32+5:302026-01-29T17:19:21+5:30
Ajit Pawar Passed Away: जयश्रीताई पाटील यांच्या घराण्याशी स्नेह

संग्रहित छाया
सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगलीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन पाटील यांचे मैत्रीपूर्ण नाते राजकारणात सर्वश्रुत होते. परखड बोलणे, ठाम भूमिका आणि माणुसकीचा ओलावा यामुळे दोघांचाही स्वभाव जुळणारा होता. मदन पाटील राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले असले तरी अजित पवार यांच्याशी असलेले त्यांचे स्नेहबंध कायम होते. एकदा सांगली दौऱ्यावर असताना अजित पवारांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, “मदन, तू माझ्यासोबत ये, तुझा-माझा स्वभाव जुळतो. तुझ्यासारखा नेता सोबत हवा”, अशी मिश्किल, पण मनापासूनची भावना व्यक्त केली होती. आज त्या आठवणींना उजाळा मिळाल्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
अजित पवार यांचा स्वभाव तसा परखड आणि रोखठोक. तितकाच कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा. तसाच स्वभाव मदनभाऊ पाटील यांचाही होता. अजितदादांचा राज्यात तर मदनभाऊंचा सांगलीत दबदबा. दोघेही काँग्रेस, नंतर राष्ट्रवादीत काम करताना मैत्रीचे सूर जुळले. दोघांतील मैत्रीचे अनेक किस्से कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत.
मदनभाऊ पाटील काँग्रेसमध्ये गेले. तर, अजितदादा राष्ट्रवादीचे नेते झाले. तरीही त्यांच्यातील स्नेह कमी झालेला नव्हता. एकदा सांगली दौऱ्यावर आले असताना अजित पवार यांनी मदनभाऊंना परत राष्ट्रवादीत येण्याचे साकडे घातले. तुझा-माझा स्वभाव सारखाच आहे, तुझ्यासारखा नेता माझ्यासोबत हवा, अशी टिप्पणी केली होती. सांगलीत आल्यानंतर सकाळी नाष्ट्यासाठी अजितदादांची विजय बंगल्यावर हजेरी ठरलेलीच. मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचे तर अजितदादा नातेवाईक. त्यामुळे हे बंध कायम राहिले.