Shaktipeeth highway: “रक्त सांडले तरी चालेल; पण एक इंचही जमीन देणार नाही”; शक्तिपीठविरोधात सांगलीतील बोरगावमध्ये रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:30 IST2026-05-18T18:30:06+5:302026-05-18T18:30:34+5:30

शासनाविरोधात संतप्त इशारा

Farmers in Borgaon area express anger against Shaktipeeth highway | Shaktipeeth highway: “रक्त सांडले तरी चालेल; पण एक इंचही जमीन देणार नाही”; शक्तिपीठविरोधात सांगलीतील बोरगावमध्ये रास्ता रोको

Shaktipeeth highway: “रक्त सांडले तरी चालेल; पण एक इंचही जमीन देणार नाही”; शक्तिपीठविरोधात सांगलीतील बोरगावमध्ये रास्ता रोको

बोरगाव : शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घालणाऱ्या आणि सुपीक जमिनींचा बळी घेणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात बोरगाव (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर रविवारी रस्त्यावर उतरला. बोरगाव, मसुचीवाडी, नवेखेड आणि जुनेखेड येथील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले. ‘रक्त सांडले तरी चालेल; पण एक इंचही जमीन देणार नाही,’ असा थेट इशारा देत सरपंच जितेंद्र पाटील यांनी शासनाला खुले आव्हान दिले.

काही काळासाठी आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलक हटवले; मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला सभा घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘शक्तिपीठ महामार्ग हद्दपार करा’, ‘शेतकरी उद्ध्वस्त करणारा महामार्ग नको’ अशा फलकांनी परिसर दणाणून गेला होता. सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, ‘विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा हा डाव आहे. पिढ्यानपिढ्या कसत आलेली सुपीक जमीन बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. शासनाने जबरदस्तीचा मार्ग अवलंबला, तर त्याला तीव्र जनआंदोलनाने उत्तर दिले जाईल.’

शेतकरी म्हणाले की, या महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन पाणथळ व नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतील, व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद पडतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल. ‘ज्या भागात नापीक आणि दलदलीची जमीन आहे, त्या भागातून महामार्ग न्यावा; पण हिरव्यागार शिवाराचा बळी देणारा अन्यायकारक मार्ग आम्हाला मान्य नाही,’ अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी जे. एस. पाटील, जयंती पाटील, सुहास कदम आणि भागवत जाधव यांनीही शासनाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका करत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला.

आंदोलन चिघळू नये म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन काही मिनिटांत हटवले असले, तरी बोरगाव परिसरात शेतकऱ्यांच्या संतापाची धग कायम आहे. ‘जमीन वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई होणार,’ असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, रणधीर पाटील, प्रमोद शिंदे, सागर पाटील, संदीप पाटील, शकील मुल्ला, हेमंत पाटील, नंदकुमार फार्णे, मालोजी पाटील आदी मान्यवर व शेकडो बाधित शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलक व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात बोरगाव येथे सरपंच जितेंद्र पाटील यांचे कुटुंब रस्त्यावर उतरले. पत्नी, मुलगी, मुलगा यांनी बॅनरबाजी व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रस्ता बंद करण्यासाठी पोलिसा़ंनी मज्जाव करताच रस्त्याच्या कडेला आंदोलन पार पडले.

Web Title : सांगली में शक्तिपीठ राजमार्ग का किसानों का विरोध, भूमि बचाने की कसम।

Web Summary : सांगली के बोरगाँव में किसानों ने प्रस्तावित शक्तिपीठ राजमार्ग का विरोध किया, उपजाऊ भूमि के नुकसान का डर है। उन्होंने सड़कें जाम कर दीं, यह दावा करते हुए कि वे अपनी जमीन सौंपने के बजाय मरना पसंद करेंगे। अधिकारियों ने हस्तक्षेप किया, लेकिन तनाव अधिक बना हुआ है क्योंकि किसानों ने निरंतर प्रतिरोध की कसम खाई है।

Web Title : Farmers protest Shaktipeeth highway in Sangli, vow to protect land.

Web Summary : Farmers in Borgaon, Sangli, protested against the proposed Shaktipeeth highway, fearing loss of fertile land. They blocked roads, asserting they would rather die than surrender their land. Authorities intervened, but tensions remain high as farmers vow continued resistance.