चार्जिंग स्टेशनचा प्रश्न लागला मार्गी, सांगलीतून धावणार ‘ई-शिवाई’ बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:50 IST2026-05-18T17:50:27+5:302026-05-18T17:50:51+5:30
ईश्वरपूरचे चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात

चार्जिंग स्टेशनचा प्रश्न लागला मार्गी, सांगलीतून धावणार ‘ई-शिवाई’ बस
प्रसाद माळी
सांगली : लवकरच आपणास सांगली ते पुणे मार्गावर राज्यमार्ग परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक शिवाई बस धावताना दिसणार आहे. इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक असणाऱ्या ईश्वरपूर आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांच्या आत उद्घाटन होण्याची शक्यता आहे. तसेच सांगलीत माधवनगरजवळ होणाऱ्या चार्जिंग स्टेशनसाठी मंत्रिमंडळाने ११ कोटी २७ लाख १९ हजार ९०० रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. लवकरच याची निविदा निघणार आहे.
इंधनावरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक प्रवासावर भर देण्यासाठी एसटी महामंडळाने ई- शिवाई बसेस सुरू केल्या आहेत. या बसेस मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये सध्या धावत आहेत. सांगली-पुणे या मार्गासाठी सांगली विभागातील सांगली, मिरज आणि ईश्वरपूर आगारासाठी प्रत्येकी ४० अशा एकूण १२० ‘ई-शिवाई’ बसेस मंजूर झाल्या आहेत. मात्र इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनला अद्याप मंजुरी मिळू शकली नव्हती. सर्वात प्रथम ईश्वरपूर येथील चार्जिंग स्टेशनला मंजुरी मिळाली व तेथील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील एक ते दोन महिन्यात ईश्वरपूर आगारातून ई-शिवाई बसेस धावू लागतील.
सांगली आगाराचे इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग स्टेशन माधवनगर येथील एसटीच्या जागेत उभारले जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, त्या प्रकल्पासाठी ११ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचे अधिकृत टेंडर लवकरच निघणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात येथील चार्जिंग स्टेशन पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मिरज आगाराचे चार्जिंग स्टेशनसाठी दिंडीवेस येथील जागा निश्चित केली असून, त्याचा प्रस्तावसुद्धा पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्यास मान्यता मिळू शकलेली नाही.
ईश्वरपूर चार्जिंग स्टेशनमध्ये या सुविधा
- ११२५ केव्हीए विद्युत सप्लाय क्षमता
- ९ चार्जिंग पाॅइंट
- देखभाल रॅम्प
- वॉशिंग रॅम्प
- स्टाफ रूम
माधवनगरजवळ या सुविधा उभारणार
- ३०५० केव्हीए विद्युत सप्लाय क्षमता
- १५ चार्जिंग पॉइंट बसवले जाणार
- देखभाल रॅम्प
- वॉशिंग रॅम्प
- स्टाफ रूम
ई-शिवाई बसची वैशिष्ट्ये
- बस प्रदूषणविरहित, पर्यावरणपूरक, वातानुकूलित व आवाजविरहित
- दोन तासात बस हाेते फुल्ल चार्ज
- एकदा चार्ज केल्यानंतर २५० किमीपर्यंत धावते
- प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकूलित लुव्हर
- ४३ प्रवाशांसाठी ‘पुश बॅक’ प्रकारची बैठक व्यवस्था
- प्रत्येक दोन सीटमध्ये दोन्ही प्रवाशांच्या मोबाइल चार्जिंगसाठी स्वतंत्र यूएसबी पोर्ट
- चालक केबिनमध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा
- प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा
- प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ॲण्ड्रॉइड टीव्ही
राज्यात पीपीपी तत्वावर २०० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार
एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ सालापर्यंत ई-बसेसमध्ये रुपांतरीत करण्यासाठी परिवहन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सार्वजिनक - खासगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ईश्वरपूर आगारातील इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे सांगली-ईश्वरपूर-पुणे या मार्गावर ई-शिवाई बस धावू लागतील. तसेच माधवनगर चार्जिंग स्टेशनला मंजुरी मिळाली असून, टेंडर निघण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे माधवनगरचे चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येण्याचा मार्ग खुला झाला आहे. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली