सांगली ते पुणे मार्गावर धावताहेत खराब, नादुरुस्त १४ शिवशाही बसेस; प्रवाशांना नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 17:47 IST2026-05-11T17:46:52+5:302026-05-11T17:47:25+5:30

या बसचे तिकीट अन्य बसेसपेक्षा जास्त असल्यामुळे आर्थिक भुर्दंडही

14 Shivshahi buses are running on the Sangli to Pune route in bad condition | सांगली ते पुणे मार्गावर धावताहेत खराब, नादुरुस्त १४ शिवशाही बसेस; प्रवाशांना नाहक त्रास

संग्रहित छाया

प्रसाद माळी

सांगली : वारंवार बिघाड होऊन मार्गात बंद पडणाऱ्या, नादुरूस्त व तोट्यात धावणाऱ्या शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या बसेसचे रुपांतर निमआराम व साध्या बसमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, सांगली, मिरज आगाराच्या १४ शिवशाही बसेस अद्यापही सांगली ते पुणे मार्गावर धावत आहेत. दरम्यान रविवार सांगलीतून पुण्याकडे निघालेली शिवशाही बस पुण्याच्या जवळ बंद पडली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा खराब शिवशाही बसेसचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रविवारी सांगली आगाराची ३५९० या क्रमांकाची शिवशाही बस सांगली बसस्थानकमधून सकाळी साडेसात वाजता पुण्याकडे निघाली होती. दुपारी पुणे काही अंतर दूर असताना वाटेतच ती बंद पडली. बराच वेळ गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांना पर्यायी बसमधून रवाना केले गेले. मात्र, त्याचा प्रवाशांना नाहक त्रास, वेळेचा अपव्यय, मनस्ताप सहन करावा लागला.

तसेच या बसचे तिकीट अन्य बसेसपेक्षा जास्त असल्यामुळे आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला. या बसेस सांगलीतून पुण्यात पोहोचण्यात ७ तासांचा अवधी लागतो. साधी बस साडेपाच ते सहा तासात पोहोचते तसेच या बसेसला प्रवासी मिळत नसून ती तोट्यात धावत आहे. त्यामुळे शिवशाहीऐवजी साधी बस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

एस.टी. महामंडळाच्या स्वमालकीच्या राज्यात ६८८ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ४५३ बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र, या बसचे आयुष्य १० वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, वातानुकुलित यंत्रणेतील अडचणी, बस उशिरा पोहोचणे, प्रवासात होणाऱ्या गैरसोयी याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे प्रवासीही घटू लागल्याने शिवशाही बसेसचे रूपांतर निमआराम व साध्या बसेसमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

विधान परिषदेत उमटले होते पडसाद

शिवशाही बसेस १० वर्षांपेक्षा जुन्या, कालबाह्य आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहेत. मात्र, तरीही वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याची बाब भाजपचे विधान परिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांनी सभागृहासमोर निदर्शनास आणली होती. बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होणे, ब्रेक निकामी होणे, इंजिन तापणे, टायर फुटणे, दरवाजे योग्य वेळी न करणे आदी बिघाड घडत असल्याचे त्यांनी समोर आणले होते.

शिवशाही बसेसची स्थिती

  • एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या राज्यात शिवशाही बसेस : ६६८
  • राज्यातील सध्या कार्यरत शिवशाही बसेस : ४५३
  • सांगली विभागात कार्यरत शिवशाही बसेस : १४
  • सांगली- पुणे शिवशाहीचे दर : ५८३ रु.
  • सांगली- पुणे साध्या बसचे दर : ४४५ रु.

एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून अधिकृत सूचना आल्यावर सांगली व मिरज आगारातील शिवशाही बसेस बंद करण्यात येतील तसेच नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या बसेसऐवजी पर्यायी बसेस मिळणे आवश्यक आहे.- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक,सांगली.

Web Title : सांगली-पुणे मार्ग पर खस्ताहाल शिवशाही बसों से यात्रियों को परेशानी।

Web Summary : सांगली-पुणे मार्ग पर 14 शिवशाही बसें खस्ताहाल हैं, जिससे खराबी और यात्रियों को असुविधा हो रही है। अधिक किराया और लंबा यात्रा समय निराशा को बढ़ाता है। साधारण बसों से बदलने की मांग की गई है।

Web Title : Faulty Shivshahi buses on Sangli-Pune route cause passenger woes.

Web Summary : 14 Shivshahi buses on Sangli-Pune route are dilapidated, causing breakdowns and passenger inconvenience. Higher fares and longer travel times add to the frustration. Replacement with simpler buses is demanded.