निवृत्त चालकांना मिळणार पुन्हा संधी

By Admin | Updated: June 28, 2016 22:48 IST2016-06-28T22:47:42+5:302016-06-28T22:48:43+5:30

एस. टी. महामंडळ : गर्दीच्या हंगामात तात्पुरती नियुक्ती

Retired drivers will get chance again | निवृत्त चालकांना मिळणार पुन्हा संधी

निवृत्त चालकांना मिळणार पुन्हा संधी

रत्नागिरी : आषाढी एकादशी, गणेशोत्सव, दीपावली, मे महिना या गर्दीच्या हंगामात एस. टी.च्या चालकांवर ताण येतो. सलग ड्युटी करावी लागते. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गर्दीच्या हंगामात निवृत्त एस. टी. चालकांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी एस. टी.च्या निवृत्त चालकांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वयोमानानुसार ५८व्या वर्षी सेवानिवृत्ती दिली जाते. महामंडळाने ६० वर्षाच्या आत असणाऱ्या चालकांनाच संधी देण्याचे म्हटले आहे. त्यासाठी इच्छूक चालकांकडून तसे पत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे ५८व्या वर्षी निवृत्त झालेल्या चालकांनाच संधी प्राप्त होणार आहे. अलिकडच्या दोन वर्षात निवृत्त झालेल्या इच्छुक चालकांना एस. टी.चे सारथ्य करण्याची संधी मिळणार आहे.
जुलैमध्ये आषाढी एकादशी, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव, तर आॅक्टोबरमध्ये दीपावली आहे. ऐन गर्दीच्या हंगामात चालकांवर कामाचा ताण येतो. त्यावेळी निवृत्त चालकांना सेवेची संधी मिळणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळात ३६ हजार ८६४ चालक, तर ३५ हजार ३१८ वाहक आहेत. रत्नागिरी विभागात १७५२ चालक, तर १४९३ वाहक आहेत. १६१ चालक - वाहकांच्या बदल्या झाल्याने चालकांची पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. सुटीच्या, सणाच्या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. मात्र, अशावेळी दुहेरी ड्युटीचा ताण येतो. सलग ड्युटी करून चालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे काही अटींवर निवृत्त चालकांच्या हातात एस. टी. देण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त चालकांना त्या दिवसाचा मोबदला म्हणून ५०० रुपये, तर जादा कामाचा मेहनताना म्हणून १०० रुपये देण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्तीनंतर अनेक चालक खासगी सेवेत कार्यरत असतात. त्यांना पुन्हा एस. टी. चालवण्यास मिळणार आहे. कोकणात निवृत्तीनंतर काम करणाऱ्यांची संख्या अल्प असली तरी अन्य विभागातील मंडळींना पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लवकरच भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Retired drivers will get chance again