गुंगीचे औषध पाजून तरुणावर अत्याचार; खासगी फोटो काढून ब्लॅकमेल, पुण्यातील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:02 IST2025-11-26T17:01:51+5:302025-11-26T17:02:00+5:30
गुंगीचे औषध देणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा अनेक कलमांखाली महिलेवर गुन्हा दाखल

गुंगीचे औषध पाजून तरुणावर अत्याचार; खासगी फोटो काढून ब्लॅकमेल, पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे: पुण्यातील कोथरूड भागात महिलेने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करताच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला स्वत:ला वकील असल्याचा आव आणत होती. कायद्याची भीती दाखवत ती तरुणाला वारंवार धमकावत असल्याचे तरुणाने सांगितले आहे. महिला त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार करत असल्याचे तरुणाने तक्रारीत नमूद केले आहे. त्यावेळी महिलेने तरुणाचे काही खासगी फोटो काढून ठेवले होते. पुढे तेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून पैशांची मागणी केली जात होती. सततच्या त्रासाला कंटाळून गेल्या काही दिवसांपासून तरुण भीतीच्या छायेखाली होता. त्यानंतरही हा अत्याचार महिलेने थांबवला नाही. तक्रारदार तरुण हा मूळचा कोल्हापूरचा होता. तिने त्याच्या घरी जाऊनही जबरदस्ती केल्याचे तरुणाने सांगितले आहे.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तरुणाकडून सतत पैशांची मागणी करत होती. बदनामीची भीती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धाकाने तरुण शांत बसला होता, मात्र तिच्या या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने कोथरूड पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचे सखोल तपास सुरू आहे.