मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:29 IST2026-03-27T12:29:22+5:302026-03-27T12:29:58+5:30
तरुणाचा सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यातील एका तरुणीसोबत मुस्लीम पद्धतीने विवाह झाला होता.

मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप
पुणे: पती-पत्नीतील वाद आणि सासरकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका २० वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करून गावी असलेल्या मित्राला पाठवला. त्यानंतर उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद साद आसीफ सय्यद (वय २०, सध्या रा. जांभुळवाडी, पुणे; मूळ रा. नयापुरा, मालेगाव, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
करीमुन्निशा उर्फ निशाखान (वय २०, रा. सप्तगिरी सोसायटी, रवी कोळी, जांभुळवाडी), सर्वर उर्फ कैफकमरू खान (वय २२, रा. संतोषनगर, कात्रज), रेश्मा कमरूखान (वय ५०), शमा जावेद शेख, जावेद शेख (वय २५), अथर्व काळे आणि इशीता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक मारुती वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साद याचा सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यातील एका तरुणीसोबत मुस्लीम पद्धतीने विवाह झाला होता. विवाहानंतर तो जांभुळवाडी परिसरात राहत होता व रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र, किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यातून सासरकडूनही त्याला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून मोहम्मद साद याने आपल्या मोबाइलवर आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओमध्ये सासरच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले. हा व्हिडीओ त्याने गावातील एका मित्राला पाठवला.
यानंतर ७ मार्च रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात डिलाइट बेकरीसमोर रिक्षा उभी करून त्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र १२ मार्च रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित मित्राने हा व्हिडीओ कुटुंबीयांना दाखवल्यानंतर मोहम्मदच्या आईने नौशा दतन्वीर अहमद (वय ४१, रा. नयापुरा, मालेगाव) आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.