महापालिकेच्या खेळाच्या मैदानात थाटला आठवडी बाजार; खेळाडू हद्दपार, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:31 IST2026-04-14T10:31:37+5:302026-04-14T10:31:59+5:30

- सुखसागर नगर येथील टिळेकर मैदानातील प्रकार

Weekly market held at the municipal playground; Players expelled, administration's meaningful neglect? | महापालिकेच्या खेळाच्या मैदानात थाटला आठवडी बाजार; खेळाडू हद्दपार, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

महापालिकेच्या खेळाच्या मैदानात थाटला आठवडी बाजार; खेळाडू हद्दपार, प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

- संतोष गाजरे 

कात्रज : मुलांच्या भविष्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या मैदानात खेळांऐवजी आता आठवडा बाजार भरू लागला आहे. सुखसागर नगर यशश्री सोसायटी भागातील ह.भ.प. पुंडलिक विठ्ठल टिळेकर या महापालिकेच्या खेळाच्या मैदानात चक्क आठवडी बाजार भरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे खेळाडूंना मैदानाबाहेर जावे लागत असून, स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ज्या मैदानावर मुलांनी धावायला हवे, सराव करायला हवा, तिथे आता भाजीपाल्याच्या गाड्या आणि दुकाने थाटली गेली आहेत. दर आठवड्याला या ठिकाणी बाजार भरत असल्याने नेमके हे मैदान खेळाडूंसाठी बनवले आहे की भाजीपाला विकणाऱ्यांसाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या नियमानुसार, खेळाच्या मैदानाचा वापर केवळ क्रीडाविषयक कामांसाठीच होणे बंधनकारक आहे. मात्र, येथे नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बाजार संपल्यानंतर मैदानावर प्लास्टिक पिशव्या, सडलेला भाजीपाला आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. 

प्रशासनाचे ‘मौन’ की ‘वरदहस्त’?

स्थानिक नागरिकांनी आणि खेळाडूंनी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. मैदानात बाजार भरविण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? वसुली कोणाच्या खिशात जाते? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यामागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याची चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे. आमच्या मुलांनी खेळायचे कुठे, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

प्रशासनाला सवाल

महापालिकेचे संबंधित अधिकारी या अनधिकृत वापराकडे डोळेझाक का करत आहेत ?

खेळाडूंच्या हक्काच्या जागेवर व्यापार थाटणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का ?

खेळाच्या मैदानाचे झालेले नुकसान महापालिका संबंधितांकडून वसूल करणार का ?

महापालिका आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन खेळाडूंना त्यांचे मैदान परत मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे के खेल के मैदान पर साप्ताहिक बाजार, खिलाड़ी बेदखल; प्रशासन अनदेखा?

Web Summary : पुणे नगर निगम के खेल के मैदान पर साप्ताहिक बाजार लगने से खिलाड़ी बेदखल हो गए हैं। शिकायतों के बावजूद, स्थानीय प्रशासन इस मुद्दे को अनदेखा कर रहा है, जिससे वित्तीय उद्देश्यों और बच्चों के खेल तक पहुंच के भविष्य पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Weekly market invades Pune playground, sidelining athletes; administration ignores?

Web Summary : A weekly market has taken over a Pune Municipal Corporation playground, displacing athletes. Despite complaints, the local administration seemingly ignores the issue, raising questions about financial motives and the future of children's sports access.