Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी
By नम्रता फडणीस | Updated: December 31, 2024 19:02 IST2024-12-31T19:00:58+5:302024-12-31T19:02:28+5:30
आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी.

Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी
पुणे : वाल्मीक कराड आपणहून पोलिसांना शरण आला आहे. आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. त्याला व्हीआयपी वागणूक दिली जाऊ नये, अशी मागणी मराठा सेवकांनी (अखंड मराठा समाज -जरांगे पाटील) केली आहे.
वाल्मीक कराड याने सीआयडी मुख्यालयात येऊन आत्मसमर्पण केल्यावर दुपारी पावणेदोनच्या सुमारास अखंड मराठा समाज जरांगे पाटील यांचे काही मराठा सेवक सीआयडी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले. मात्र पोलिसांनी मराठा सेवकांना आत येण्यास मज्जाव केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून एसआरपीएफची गाडी देखील तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी मराठा सेवकांना कार्यालयापासून काही अंतरावर नेले. मराठा सेवक अर्चना शहा भिवरे पाटील म्हणाल्या, आम्ही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात मराठा सेवक म्हणून काम करीत आहोत.
आज मराठा असलेले संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येचा निषेध म्हणून आम्ही मोर्चे काढत होतो, सभा घेत होतो. त्याला कुठेतरी यश मिळाले आणि कराड हा पोलिसांसमोर शरण आला. कुठल्याही परिस्थितीत वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.