अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:15 IST2025-11-17T15:15:32+5:302025-11-17T15:15:46+5:30
रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते

अंधारात थांबलेला ट्रक; दुचाकीस्वार पाठीमागून आदळला, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू
पुणे: नगर रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रंजीत छोटन मिश्रा (३५, रा. बालाजीनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अशोक माने यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रंजीत मिश्रा शनिवारी (दि. १५) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून निघाला होता. कटकेवाडीजवळ असलेल्या परफेक्ट वजनकाट्याजवळ लोखंडी साहित्य घेऊन निघालेला ट्रक थांबला होता. रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू केले नव्हते. त्यामुळे अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकीस्वार मिश्रा ट्रकवर पाठीमागून आदळला. अपघातात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुचाकीस्वार मिश्राला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राघू करत आहेत.