पोलिसांत तक्रार करण्याची धमकी; ५ लाखही मागितले, कामगाराने त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:19 IST2026-01-05T12:18:17+5:302026-01-05T12:19:58+5:30
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वही, तसेच सोशल मीडियावर आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते

पोलिसांत तक्रार करण्याची धमकी; ५ लाखही मागितले, कामगाराने त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
पुणे : पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांविरोधात येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रामदास भरत पवार (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबबात पवार यांची बहीण रूपाली संतोष पुजारी (३३, रा. बाळासाहेबनगर, लोणंद, जि. सातारा) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पवार हे कोंढव्यातील येवलेवाडी भागात असलेल्या शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलून येथे कारागीर म्हणून कामाला होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्याशी त्यांचा वाद झाला होता. आरोपींनी पवार यांना पोलिसांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली होती. तक्रार न देण्यासाठी पवार यांच्याकडे आरोपींनी पाच लाख रुपये मागितले होते. आरोपींनी दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आरोपी त्रास देत असल्याची माहिती त्यांनी बहिणीला दिली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वही, तसेच सोशल मीडियावर आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. ३० डिसेंबर रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. पवार यांच्या बहिणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक थोरात पुढील तपास करीत आहेत.