जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला
By नितीन चौधरी | Updated: May 27, 2025 16:58 IST2025-05-27T16:57:40+5:302025-05-27T16:58:10+5:30
पूर्व मोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली

जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला
पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तसेच मध्य प्रदेशातील प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून, येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मॉन्सूनने व्यापला जाईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. पूर्व मोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी मॉन्सूनच्या प्रवासात प्रगती झाली नाही.
मॉन्सूनने केवळ २४ तासांमध्ये केरळमधून थेट राज्यात धडक दिली. त्यानंतरच्या २४ तासांमध्ये तळकोकणातील मुक्काम पुढे नेत मॉन्सून मुंबई पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला. मात्र, मंगळवारी त्याची वाटचाल काहीशी रखडली. सध्या अरबी समुद्रात तयार झालेली प्रणाली तसेच उत्तर कोकणावर तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडवरही एक प्रणाली स्थित असून ७० अंश उत्तरेला एक कमी दाबाची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीवरही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मध्य प्रदेशातील मध्य भागात आणखी एक प्रणाली तयार झाली आहे. परिणामी मॉन्सूनच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता काश्यपी यांनी व्यक्त केली.
८० टक्के भागात मॉन्सून
अरबी समुद्रावरून तसेच बंगालच्या उपसागरावरून पश्चिमी वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सोमवारी व मंगळवारी कोकण, मुंबई, तसेच पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर या भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मॉन्सूनच्या या तीव्र प्रवाहामुळे पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात ८० टक्के क्षेत्रावर मॉन्सूनचे आगमन झालेले असेल, असेही ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रातही पाऊस
पूर्व मोसमी पावसाचा प्रभाव कोकण, पुणे, सातारा, सांगली या परिसरात अधिक दिसून आला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, मध्य महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये केवळ ढगाळ वातावरण होते. या जिल्ह्यांमध्ये अपवाद वगळता पाऊस झाला नाही. मात्र, आता मध्य प्रदेशावरील तयार झालेल्या प्रणालीमुळे पुढील तीन ते चार दिवसांत या चारही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल, असेही काश्यपी यांनी स्पष्ट केले.