दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:55 IST2025-07-07T15:55:19+5:302025-07-07T15:55:30+5:30
दुचाकीस्वार पती, पत्नी आणि दोन मुले लोहगाव भागातून रात्री अकराच्या सुमारास निघाले होते

दुचाकीवरून संपूर्ण कुटुंब चाललं होतं; टेम्पोची धडक, महिलेचा मृत्यू, २ लहान मुले जखमी
पुणे : लोहगाव परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. अपघातात दोन लहान मुले जखमी झाली. रुक्मिणी राजू चव्हाण (२९, रा. पठारे वस्ती, लोहगाव ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात चव्हाण यांची दोन लहान मुले जखमी झाली आहेत. याबाबत राजू चव्हाण (३३) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राजू, त्याची पत्नी रुक्मिणी आणि दोन मुले लोहगाव भागातून ४ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास निघाले होते. धानोरी जकात नाक्याजवळ भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रुक्मिणी आणि त्यांची दोन मुले जखमी झाली. रुक्मिणी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी मुलांसह रुक्मिणी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुक्मिणी यांचा मृत्यू झाला. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिस कर्मचारी वाय. एस. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.