'रिल्सपायी करून घेतलं पोरांनी आयुष्य खराब', पुणे पोलिसांनी मुंडन करून थेट माफीच मागायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:36 IST2025-12-15T14:36:02+5:302025-12-15T14:36:46+5:30
गुन्हेगारीचे व्हिडिओ बनवून समाजात चुकीचा संदेश देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा थेट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

'रिल्सपायी करून घेतलं पोरांनी आयुष्य खराब', पुणे पोलिसांनी मुंडन करून थेट माफीच मागायला लावली
किरण शिंदे
पुणे: पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. कोयता हल्ले, खून, टोळीयुद्ध यामुळे कधीकाळी शांत शहर म्हणून ओळख असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारीसाठी ओळखलं जाऊ लागले आहे. आणि त्यात भर पडलीय सोशल मीडियाची. गुन्हेगारीचा उदातीकरण करणारे रिल्स तयार करून ते व्हायरल करण्याचा जणू ट्रेंड झाला आहे. त्यामुळे पोलिसही आता सतर्क झाले आहेत. चिथावणीखोर आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील्स बनवणारे रिल्स स्टार पोलिसांच्या रडारवर आहेत. असंच रील बनवणाऱ्या दोन तरुणांना खडकी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. खडकी भागातील या दोन तरुणांनी ‘येरवडा जेल… दो भाई… दोनो तबाही… जिंदगी खराब करून टाकेल…’ अशा शब्दांत गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ अपलोड केला होता.
या व्हिडिओत वापरलेली भाषा आक्षेपार्ह होती. त्याहीपेक्षा जास्त ती गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणारी आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि तो खडकी पोलिसांच्याही नजरेत आला .व्हिडिओची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी या दोन्ही तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचं मुंडन करून थेट कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावण्यात आली. गुन्हेगारीचे व्हिडिओ बनवून समाजात चुकीचा संदेश देणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा थेट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
खरंतर मागील काही वर्षापासून पुण्यासह आसपासच्या परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोयता हल्ले, खून, हाणामाऱ्या आणि टोळीयुद्धामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची हत्या केल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे, दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्सवर पोलिसांनी केलेली कारवाई इतरांसाठी धडा ठरेल.