टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:20 IST2025-08-18T12:19:58+5:302025-08-18T12:20:20+5:30
कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाईनगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर (ता. पारनेर) येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय ३८), त्यांच्या मातोश्री शांताबाई मकाजी वाजे (वय ६८) आणि मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (वय ५) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाजे हे आपली आई आणि लहान मुलासह मुंबईहून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून (एमएच १६ सीडी ९८१९) गावाकडे परतत होते. पहाटे कवठे येमाई येथील बंटी हॉटेलजवळ त्यांच्या टँकरने मालवाहू ट्रकला (एमएच ४२ बी ८८६६) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टँकर थेट ट्रकमध्ये घुसला.
अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वडनेर गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांकडून तपास सुरू आहे.