रेल्वेला साखर झाली कडू; तब्बल ७५ कोटींचा महसूल कमी, वाहतुकीत गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:24 IST2025-11-27T16:24:09+5:302025-11-27T16:24:49+5:30
महाराष्ट्र हा साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने या विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत

रेल्वेला साखर झाली कडू; तब्बल ७५ कोटींचा महसूल कमी, वाहतुकीत गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्के घट
पुणे: पश्चिम महाराष्ट्र साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, या साखरपट्ट्यात गेल्या वर्षी २७ टक्के साखरेचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे यंदा रेल्वेतून साखरेच्या होणाऱ्या वाहतुकीत गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे साखर वाहतुकीतून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पादनात ७५ कोटी रुपयांचा महसूल कमी झाला आहे, तर तेल, रेल्वे सामग्री, कांदा आणि मका यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसर वाहन कंपन्यांचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यातून सर्वाधिक दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक होते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र हा साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो टन साखरेचे उत्पादन होते. पुण्यातून साखरेची निर्यात आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक होते. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात होते. त्यानंतर कांदा, मका, मळी यांची निर्यात देशातील सर्व भागात होते. याचा फायदा रेल्वेला होतो आहे. परंतु, यंदा साखर उत्पादनात २७ टक्के घट झाली आहे. त्यामुळे साखरेची मालवाहतुकीत घट झाली.
यंदा साखर उत्पादनात २७ टक्के घट झाली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून साखरेची वाहतूक कमी झाली आहे, तर इतर मालाची वाहतूक वाढली आहे. आता साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा साखरेची मालवाहतूक वाढणार आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
मालवाहतूक आकडेवारी : (एप्रिल ते ऑक्टोबर)
शेतमाल/वस्तू ---- रेक --उत्पन्न
साखर -- २०४ --- १२२
वाहन (ऑटोमोबाइल) -- ३३२-- ५४
ऑइल --- १५०-- २३
रेल्वे सामग्री -- १३९ -- ११