Pune Crime: अचानक वर्गात घुसला; दप्तरातून कोयता काढत थेट दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला, परीक्षा केंद्रावर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:32 IST2026-03-16T15:32:04+5:302026-03-16T15:32:39+5:30

Koyta Gang Attack: संबंधित विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केल्याने जीव वाचला

Suddenly entered the classroom; took out a sickle from his bag and attacked a 10th grade student, causing chaos at the exam center | Pune Crime: अचानक वर्गात घुसला; दप्तरातून कोयता काढत थेट दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला, परीक्षा केंद्रावर गोंधळ

Pune Crime: अचानक वर्गात घुसला; दप्तरातून कोयता काढत थेट दहावीच्या विद्यार्थ्यावर हल्ला, परीक्षा केंद्रावर गोंधळ

ओतूर (जुन्नर) : येथील चैतन्य विद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थ्यावर एका १७ वर्षीय अनोळखी अल्पवयीन मुलाने ओतूर परीक्षा केंद्रावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. सुदैवाने विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत हातावर वार झेलून स्वतःचा बचाव केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देण्यासाठी परीक्षेसाठी गेला होता. त्यावेळी एक १७ वर्षीय अनोळखी अल्पवयीन मुलगा अचानक वर्गात घुसला. त्याने आपल्या दप्तरातून कोयता काढत संबंधित विद्यार्थ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र संबंधित विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखून हातावर वार झेलत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे त्याचा जीव वाचला असून त्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
    
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात हल्ला करणारा आणि जखमी झालेला अल्पवयीन तरुण असल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नंबरप्रमाणे आम्ही काम करत होतो. त्यावेळी अचानक गोंधळाचा आवाज झाला. आम्ही तात्काळ धाव घेत विद्यार्थ्यांची सुटका केली. संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हल्ला झालेल्या विद्यार्थ्याला रायटर देण्यात आला व त्याने इतिहासाचा पेपर पूर्ण केला आहे.-  संपत माने, केंद्र प्रमुख

Web Title: Suddenly entered the classroom; took out a sickle from his bag and attacked a 10th grade student, causing chaos at the exam center