पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने सुरु होणार अभ्यास केंद्र; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:49 IST2021-01-25T02:49:31+5:302021-01-25T02:49:42+5:30

‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त प्रबोधन महोत्सव

A study center will be started in the name of Prabodhankar at Pune University; Minister Uday Samant's announcement | पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने सुरु होणार अभ्यास केंद्र; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने सुरु होणार अभ्यास केंद्र; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांचे सत्यशोधक विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.  ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात सामंत यांनी बालगंधर्व कलादालनातील छायाचित्र-व्यंगचित्र तसेच प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या साहित्यसंपदेची पाहणी केली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे विद्यापीठात अभ्यास केंद्र आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनकारांविषयी माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात धडा समाविष्ट करावा, अशी मागणी सुनील महाजन यांनी केली. विद्यापीठात अभ्यास केंद्र सुरू करण्याच्या मागणीस सामंत यांनी तत्काळ मान्यता देत यासंदर्भात कुलगुरूंशी चर्चा झाली असून अभ्यास केेंद्रासाठी समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. 

प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासनही सामंत यांनी दिले. प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होण्यासाठी रत्नागिरीत अशा प्रकारचा महोत्सव सुरू करण्याची जबाबदारी मी घेतो. प्रबोधन महोत्सव महाराष्ट्रातील किमान दहा मोठ्या शहरांमध्ये व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दिल्लीत संकुल
सामंत म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत संकुल उभारण्याची कल्पना आहे. तसेच प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी पुण्यातही लवकरच टीचर्स अकॅडमी सुरू करणार असून याची प्रक्रिया दोन-तीन महिन्यांत सुरू होईल.
 

Web Title: A study center will be started in the name of Prabodhankar at Pune University; Minister Uday Samant's announcement