ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:20 IST2026-04-23T06:19:31+5:302026-04-23T06:20:45+5:30
Iran-US Tensions: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली.

ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
दुबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली आहे. इराणने बुधवारीही आपले आक्रमक धोरण कायम ठेवत होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला. त्यातील दोन जहाजे जप्त केली असून, त्यातील जहाज भारताकडे येणार होते. सागरी हद्दीविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच या जहाजांवर कारवाई करण्यात आल्याचे समर्थन इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डने (आयआरजीसी) केले आहे. या घटनांमुळे युद्धातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे कायमस्वरूपी प्रतिनिधी अमीर सईद इरावानी यांनी सांगितले की, नाकेबंदी हटविल्यानंतरच अमेरिकेसोबत चर्चा होऊ शकते.
वाटाघाटींमधील अडथळा
इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी बसण्यापूर्वी अमेरिकेने नौदल नाकेबंदी उठवावी, अशी अट इराणने ठेवली आहे. जोपर्यंत नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत युद्धविरामाला काहीही अर्थ नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे.
जहाजाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये छेडछाड; सागरी सुरक्षेला धोका
आयआरजीसीने दिलेल्या माहितीनुसार लायबेरियाच्या ध्वजाखालील एपामिनॉण्डस हे कंटेनर जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे जात होते. इराणी नौदलाने दावा केला आहे, की या जहाजाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये छेडछाड झाली होती, ज्यामुळे आमच्या क्षेत्रातील सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर आयआरजीसीने ते जहाज रोखून ताब्यात घेतले किनाऱ्याकडे नेले. याशिवाय फ्रान्सिस्का नावाचे इस्रायलशी संबंधित जहाजही इराणने ताब्यात घेतले आहे. तसेच युफोरिया नावाच्या जहाजावर हल्ला केला.
जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणला पैसे दिलेले नाहीत
भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी इराणला रोख रक्कम किंवा क्रिप्टोकरन्सी स्वरुपात पैसे दिले नसल्याचे भारताने बुधवारी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय? इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत युद्धविराम कायम राहील
- अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणला दररोज सुमारे ४७०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्या देशाच्या सैनिक आणि पोलिसांना वेळेवर वेतन मिळत नाही. परिणामी, देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला.
- आर्थिक दुरवस्थेमुळे इराणमध्ये देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत आहे. इराणकडे आता पैशांची कमतरता आहे, त्यामुळे तो तत्काळ होर्मुझ सामुद्रधुनी खुली करू इच्छितो. इराणवर दबाव कायम ठेवण्यासाठी नाकेबंदी सुरूच राहील, असेही ट्रम्प म्हणाले.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी मंगळवारी अमेरिकी राजदूत नताली बेकर यांची भेट घेऊन युद्धविराम वाढविण्याची विनंती केली होती.