राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:38 IST2026-04-23T06:35:00+5:302026-04-23T06:38:16+5:30
Maharashtra Employment: राज्यात २.५६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे १८ विशाल/अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे राज्यात एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात २.५६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे १८ विशाल/अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे राज्यात एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील विविध विभागांच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकणाच्या विकासाला चालना
- या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल.
- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबलगन, एमआयडीसीचे सीईओ पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह बैठकीला उपस्थित होते.
जिल्हानिहाय गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती
| शहर / जिल्हा | कंपनीचे नाव | गुंतवणूक (कोटी रुपये) | रोजगार निर्मिती |
| नाशिक | व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. | ८०० कोटी | ५०० |
| अमरावती | टॅंबो डिफेन्स प्रॉडक्ट प्रा. लि. | १००० कोटी | - |
| छ. संभाजीनगर | नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा.लि. | १५०० कोटी | १००० |
| शिरूर (पुणे) | जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. | १५०० कोटी | ३००० |
| गडचिरोली | हरीओम पाईप इंडस्ट्रिज लि. | ३१३५ कोटी | ८००० |
| अहिल्यानगर | निबे स्पेस | ४००० कोटी | १००० |
| तळेगाव, पुणे | युरोबॅस इंडिया प्रा.लि. | ४२०० कोटी | १२,००० |
| चंद्रपूर | मिलियन स्टील प्रा.लि. | २५६ कोटी | ३६० |
| भंडारा | अशोक लेलंड लि. | १०,००० कोटी | १००० |
| नागपूर | अॅक्मे क्लिनटेक सोल्यूशन प्रा.लि. | ११,४०० कोटी | ७००० |
| पालघर आणि रायगड | अॅक्मे क्लिनटेक सोल्यूशन प्रा.लि. | ११,००० कोटी | २५०० |
| नागपूर | सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लि. | १२,७८० कोटी | ६८२५ |
| अहिल्यानगर आणि धाराशिव | ग्लोब फोर्ज लि. | १५,४३० कोटी | ३६०० |
| रायगड | बालासोर अलॉयज | १७,४७९ कोटी | ३२०० |
| छ. संभाजीनगर | गोदावरी न्यू एनर्जी प्रा.लि. | २७,५१५ कोटी | ४००० |
| रायगड आणि पालघर | अॅक्मे क्लिनटेक प्रा.लि. | ३७,८०० कोटी | ४५०० |
| गडचिरोली | रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि. | ४०,००० कोटी | २०,००० |
| गडचिरोली | एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन लि. | ५८,८५२ कोटी | २५,००० |