भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:52 IST2026-01-01T11:51:59+5:302026-01-01T11:52:47+5:30
दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

भरधाव कारची दुचाकीला धडक; आई-मुलाचा मृत्यू, भोर–कापूरहोळ रस्त्यावरील घटना
नसरापूर : भोर–कापूरहोळ रस्त्यावरील कासुर्डी (गुंजन मावळ) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तेलवडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले (वय ५५) आणि त्यांचा मुलगा अमृत लक्ष्मण धावले (वय २७, दोघेही रा. तेलवडी, ता. भोर) हे दुचाकीवरून शेतात जाण्यासाठी निघाले होते. भोर बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारांदरम्यान त्यांना मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील आई-मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तेलवडी गावात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी कारचालक स्वप्नील सुनील पठारे (वय ३७, रा. बी.यू. भंडारी सोसायटी, ए-५ विंग, फ्लॅट नं. १०१, तुकारामनगर, खराडी गावठाण, पुणे) याच्याविरोधात संतोष रामचंद्र धावले यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलिस करीत आहेत.