‘टीईटी पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी’, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:11 IST2025-11-25T15:10:52+5:302025-11-25T15:11:31+5:30
राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढून टीईटी परीक्षा सुरळीत पार पडली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असे स्पष्ट केले आहे.

‘टीईटी पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी’, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे
पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. याबाबत युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेने राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्त यांना पत्रही पाठविले आहे.
राज्यातील एकूण ३६ परीक्षा केंद्रावर रविवारी (दि. २३) टीईटी परीक्षा पार पडली. या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व राधानगरी परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याचे आढळून आले. यासंदर्भात कोल्हापूर पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने टीईटी परीक्षेच्या पारदर्शकता, गोपनीयता आणि विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापूर पोलिसांनी कागल–राधानगरी पेपरफुटी प्रकरण वेळीच उधळून लावले असले तरी, राज्यभर गेल्या कित्येक दिवसांपासून एजंट उमेदवारांना कॉल करून सक्रिय असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करणे आवश्यक आहे. यात एजंटांकडे सापडलेले कोरे चेक, मार्क मेमो आणि संबंधित कागदपत्रांवरील नमूद उमेदवारांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. आरोपी उमेदवार शिक्षक असतील तर त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना OMR सीट कोरी सोडली असेल तर त्याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास पुढील परीक्षेला बंदी घालावी. यात शिक्षक आढळला तर निलंबित करावे. टीईटी परीक्षेची प्रतिष्ठा आणि पारदर्शकता राखण्यासाठी तात्काळ व काटेकोर कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढून टीईटी परीक्षा सुरळीत पार पडली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असे स्पष्ट केले आहे.