Pune: नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार; आरएमसी प्लांट ६ महिन्यात शहरातून हद्दपार करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:19 IST2026-05-08T13:18:07+5:302026-05-08T13:19:34+5:30

शहराच्या विविध भागात रेडी मिक्स सिमेंट प्लांट (आरएमसी) मधून सिमेंटची वाहतूक करणारे मिक्सर, डंपर यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे

Serious diseases due to dust entering nose and mouth; RMC plant will be removed from the city in 6 months, information from the District Collector | Pune: नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार; आरएमसी प्लांट ६ महिन्यात शहरातून हद्दपार करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Pune: नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार; आरएमसी प्लांट ६ महिन्यात शहरातून हद्दपार करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प येत्या सहा महिन्यांत शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे प्रकल्प बंद करावेत, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराबाहेरील हद्द निश्चित करून त्या पलीकडे हे प्लांट हलवण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तसेच हा प्रकल्प चालविण्यासाठी येत्या १५ दिवसांत नियमावली तयार करण्यात येणार आहे. मात्र, जे प्रकल्प अनधिकृत आहेत, ते कायमस्वरूपी बंदच राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात आरएमसी प्लांट्समुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाका-तोंडात धूळ जाऊन गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाेलिस, क्रेडाई, आरएमसी प्रकल्प चालक आदी उपस्थित होते.

शहराच्या विविध भागात रेडी मिक्स सिमेंट प्लांट (आरएमसी) मधून सिमेंटची वाहतूक करणारे मिक्सर, डंपर यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. रस्ते धोकादायक झाल्याने अपघात होत आहेत. सिंहगड रस्ता परिसरात धायरी फाटा कॅनॉल लगत तसेच प्रयेजा सिटीच्या परिसरात आरएमसी प्लांट आहेत. त्यासाठी सिमेंटची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे धुळीची समस्या गंभीर झाली आहे. सिंहगड रस्ता व लगतच्या रस्त्यांवर खडी, सिमेंट पडल्याने रस्ते धोकादायक झाले आहेत. आरएमसी प्लांटवरील सिमेंटची वाहतूक करताना प्रदूषण महामंडळाच्या नियमांचे पालन होत नाही. त्यावर नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आरएमसी प्रकल्पाबाबतची वृत्त मालिका ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने लोहगाव-खांदवे नगरमधील अनधिकृत सात आरएमसी प्रकल्प जमीनदोस्त केले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यांवरील आरएमसी प्रकल्पावर कारवाई केली जाणार होती. पण, पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच टीप दिल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती.

नागरिकांच्या समस्यांची गंभीरपणे दखल

जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात शहरातील सर्व आरएमसी प्लांट हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येणार असून, त्यासाठी शहराची हद्द निश्चित केली जाणार आहे. त्या हद्दीबाहेर हे प्रकल्प हलविण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यापलीकडे प्रकल्पांना परवानगी देण्यात येईल, असे जितेंद्र डुडी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी कमी होतील तसेच आरएमसी वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघातही टळतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकल्पांसाठी नियमावली तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवसांत सर्व संबंधित विभाग एकत्रित बसून नियमावली तयार करणार असल्याचे डुडी यांनी सांगितले. या नियमावलीनुसारच यापुढे हे प्रकल्प चालविण्याचे बंधन प्रकल्प चालकांवर घालण्यात आले आहे.

प्रकल्पासाठी वेळा निश्चित

सध्या सुरू असलेले प्रकल्प ठरावीक वेळेत चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावेळेपूर्वी किंवा नंतर प्रकल्प सुरू असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानुसार बुधवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी हे प्रकल्प सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या चार दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यानच प्रकल्प सुरू ठेवता येणार आहेत. प्रकल्पासाठीची नियमावली तयार होईपर्यंत या प्रकल्पांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले..

अनधिकृत प्रकल्प कायमचेच बंद

शहरात विनापरवाना सुरू असलेले आरएमसी प्लांट बंद करण्यात येतील. अनेक प्रकल्प हे नदी पात्रात निळ्या रेषेच्या आत सुरू असून, या प्रकल्पांना परवानगी मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत प्रकल्प शहराच्या बाहेर हलविले जातील, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

Web Title : पुणे: आरएमसी प्लांट 6 महीने में शहर से बाहर होंगे, धूल से बीमारी।

Web Summary : धूल प्रदूषण और स्वास्थ्य समस्याओं के कारण पुणे के आरएमसी प्लांट छह महीने के भीतर शहर की सीमा से बाहर स्थानांतरित किए जाएंगे। अनधिकृत प्लांट स्थायी रूप से बंद कर दिए जाएंगे। नए नियम जल्द।

Web Title : Pune RMC plants to be moved out of city in 6 months.

Web Summary : Pune's RMC plants, causing dust pollution and health issues, will be relocated outside city limits within six months. Unauthorized plants will be permanently shut down. New regulations are coming.