हिरा सरवदे
पुणे: आत्मपरीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प बुधवार (दि.१५) मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याची घोषणा पुणे आरएमसी असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, दिवसभर बंद असणारे प्रकल्प रात्रीच्या वेळी सुरू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्प मालकांकडून असोसिएशनच्या घोषणेला कात्रजचा घाट दाखवण्यात आल्याचे चित्र आहे. दरम्यान, आरएमसी प्रकल्पांवरील थांबलेली कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असून, कोणत्याही दबावाला जुमानले जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
शहरातील लोहगाव, खांदवे नगर, वडगाव खुर्द (जुने गावठाण), धायरी, बावधन, उंड्री, शेवाळवाडी या परिसरात आरएमसी प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरात धुळीचे आणि फुफाट्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रदूषणाच्या पातळीतही मोठी वाढ होत आहे. वडगाव येथील काही प्रकल्पातील सिमेंट काँक्रीटचा राडारोडा, केमिकल मिश्रित स्लरी थेट मुठा नदीत सोडण्यात येत असल्याने मुठा नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट कारवाई करत लोहगाव, खांदवेनगर येथील सात आरएमसी प्रकल्प जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर वडगाव खुर्द येथील नदीकिनारी व परिसरात असलेल्या आरएमसी प्रकल्पांवर शुक्रवारी पहाटे कारवाई करण्यात येणार होती. मात्र, प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांनी कारवाईची माहिती प्रकल्प चालकांना दिली. येथील प्रकल्प एका आमदारांच्या मुलाचा आणि एका नगरसेविकेच्या मालकीचा आहे. त्यामुळे आमदार व नगरसेविकेच्या पतीने प्रशासनावर दबाव आणल्याने नियोजित कारवाई प्रशासनाने अचानक रद्द करण्यात आली. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे आरएमसी प्रकल्पांवरील थांबलेली कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
दरम्यान, आरएमसी उद्योगासाठी असलेल्या सध्याची नियमावली विस्कळीत असून, यात सुसूत्रता आणावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, कार्यवाही होत नाही. शिवाय आरएमसी प्रकल्पाविरोधातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आत्मपरीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी शहरातील आरएमसी प्रकल्प बुधवार (दि.१५) मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा पुणे आरएमसी असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली. मात्र, दिवसभर बंद असणारे प्रकल्प रात्रीच्या वेळी सुरू असतात. प्रकल्प सुरू असताना ज्या प्रकारे डंपर व मिक्सरच्या फेऱ्या सुरू असतात, तशाच फेऱ्या आता रात्रीच्या वेळी सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे असोसिएशनने घेतलेल्या भूमिकेला प्रकल्प मालकांनी तिलांजली दिल्याचे चित्र आहे.
पुन्हा कारवाई मोहीम होणार सुरू
शहरातील आरएमसी प्रकल्पांवरील थांबलेली कारवाई मोहीम पुन्हा सुरू केली जाणार आहे. नागरिकांना त्रास होणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई करताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला जुमानले जाणार नाही. कारवाईचे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.
पीडित रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्रकल्पामुळे रहिवासी त्रस्त आहेत. प्रकल्पाच्या डंपर आणि मिक्सरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई केली जात नाही. प्रकल्प बंद आहेत, असे अधिकारी सांगतात, तेच प्रकल्प प्रत्यक्षात सुरू असतात. आता प्रकल्प बंद असल्याचे सांगितले जात असले तरी रात्रीच्या वेळी प्रकल्प सुरूच असतात. शिवाय महापालिकेने कारवाईची मोहीमही थांबवली आहे. यामुळे पालिकेने केवळ दिखाव्यासाठी कारवाई केल्याची टीका करत वडगाव खुर्द येथील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचे स्वरुप जाहीर केले जाणार असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
शहरातील आरएमसी प्रकल्प बंद ठेवण्याची विनंती असोसिएशनतर्फे करण्यात आली होती. त्या विनंतीनुसार शहरातील सर्व प्रकल्प बंद आहेत. हा निर्णय सर्वांसाठी घेण्यात आला आहे. त्यानंतरही काही प्रकल्प रात्रीच्या वेळी सुरू केले जात असतील, तर असोसिएशनचे पदाधिकारी पाहणी करून संबंधितांना प्रकल्प बंद ठेवण्याची विनंती करतील. - प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, पुणे आरएमसी असोसिएशन
Web Summary : Despite RMC Association's closure call, plants operate at night, causing pollution. Authorities plan action against rule breakers, facing public anger and political pressure. Residents threaten protests.
Web Summary : आरएमसी एसोसिएशन के बंद के आह्वान के बावजूद, संयंत्र रात में चालू हैं, जिससे प्रदूषण हो रहा है। अधिकारी नियम तोड़ने वालों के खिलाफ कार्रवाई की योजना बना रहे हैं, सार्वजनिक क्रोध और राजनीतिक दबाव का सामना कर रहे हैं। निवासियों ने विरोध प्रदर्शन की धमकी दी है।