पुणे : शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. शिवाय प्रमुख गाड्यांचे तिकीट जूनपर्यंत फुल्ल झाले आहेत. परिणामी, ऐनवेळी सुट्टीच्या हंगामात प्रवासाचे बेत आखणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु उन्हाळ्यात रेल्वेला वाढणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून काही मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तरीही वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वेगाड्यांसह स्थानक परिसरही ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे.
पुणे शहर हे उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी लगबग असते. बाहेरील राज्यातून कामानिमित्त व नोकरीसाठी पुण्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून दररोज किमान दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. परिणामी, एस. टी. बससह रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने येथून तिरूपतीसह मुंबई, दिल्ली, दानापूर, कोलकाता, चेन्नई, गोरखपूर, आदी महत्त्वपूर्ण शहरांत रेल्वेसेवा सर्व प्रवाशांसाठी किफायतशीर आहे. सध्या बारावी, दहावीसह शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे.
या आहेत प्रमुख गाड्या
पुण्यातून उत्तरेकडे धावणाऱ्या जम्मू-तावी झेलम एक्स्प्रेस, दानापूर एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, बनारस एक्स्प्रेस आणि सात्रांगाची या सर्व गाड्यांना जूनपर्यंत शंभर ते दोनशेपर्यंत वेटिंग आहे; तर मुंबईतून सुटणाऱ्या व दक्षिणेकडे जाणाऱ्या कन्याकुमारी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस आणि त्रिवेंद्रम एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांना साधारणपणे ३० मेपर्यंत तिकीट फुल्ल आहे.
स्पेशल गाड्यांचा आधार
रेल्वेचा प्रवास किफायतशीर असल्यामुळे उन्हाळी सुटीत प्रवाशांची गर्दी असते. याची दखल घेऊन पुणे विभागातून काही मार्गांवर रेल्वे प्रशासनाकडून ५७७हून अधिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तरीही प्रवासी संख्या लक्षात घेता दानापूर, दिल्ली, पटना आणि लखनाै या शहरांकडे जादा गाड्या सोडणे गरजेचे आहे. तसेच साप्ताहिक धावणाऱ्या गाड्या नियमित करणे आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गर्दीचे काही प्रमाणात नियंत्रण करता येईल. अन्यथा प्रवाशांना कोंबून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही.
उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून एकूण ५७७ समर स्पेशल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे भविष्यात आणखी गाड्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. - हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
अशी आहे आकडेवारी
- एकूण फलाट संख्या - ६- पुणे स्थानकातून जाणाऱ्या गाड्या - २००- प्रवाशांची संख्या - दोन लाख- पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या - ७५.
Web Summary : Summer vacation causes huge passenger surge at Pune station. Many trains are fully booked until June. To cope, Pune division has added 577 special trains on select routes, but more are needed to ease overcrowding on routes to cities like Danapur and Delhi.
Web Summary : गर्मी की छुट्टियों के कारण पुणे स्टेशन पर यात्रियों की भारी भीड़ है। जून तक कई ट्रेनें पूरी तरह से बुक हैं। इससे निपटने के लिए, पुणे मंडल ने चुनिंदा मार्गों पर 577 विशेष ट्रेनें जोड़ी हैं, लेकिन दानापुर और दिल्ली जैसे शहरों के मार्गों पर भीड़ कम करने के लिए और अधिक की आवश्यकता है।