Viral Video : रिल्ससाठी जीवाशी खेळ..! पुण्यात धावत्या दुचाकीवर मुलांची अंघोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:08 IST2026-04-29T15:02:30+5:302026-04-29T15:08:34+5:30
Viral Video : तापकीर चौकात दोन अल्पवयीन मुलांनी धावत्या दुचाकीवर अंघोळ करत स्टंट केल्याचा प्रकार उघडकीस आला

Viral Video : रिल्ससाठी जीवाशी खेळ..! पुण्यात धावत्या दुचाकीवर मुलांची अंघोळ
पुणे - शहरात सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात तरुण पिढी धोकादायक कृत्यांकडे वळत असल्याचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील काळेवाडी येथील तापकीर चौकात दोन अल्पवयीन मुलांनी धावत्या दुचाकीवर अंघोळ करत स्टंट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, वर्दळीच्या तापकीर चौकातून दोन अल्पवयीन मुलं दुचाकीवरून जात असताना मागे बसलेल्या मुलाच्या हातात पाण्याची बादली होती. धावत्या गाडीवरच त्याने अंगावर पाणी ओतत ‘स्टंट’ केला. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेमुळे केवळ संबंधित मुलांचा जीव धोक्यात आला नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्याही सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला. भर गर्दीत आणि वाहतुकीच्या वेळी अशा प्रकारे स्टंटबाजी करणे अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. रिल्सच्या नादात अल्पवयीन मुलं वाहतूक नियमांचा पूर्णपणे अवमान करत आहेत. अशा प्रकारांमुळे मोठे अपघात घडू शकतात. अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली असून, संबंधित मुलांसह त्यांच्या पालकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे मत व्यक्त केले जात आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन वाहतूक पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.