पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात अंमली पदार्थांच्या वापराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलचंद पानामध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बंटा’ गोळ्यांचा वापर होत असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना दिनदयाळ हॉस्पिटल परिसरात एक टेम्पो संशयास्पद अवस्थेत उभा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टेम्पोची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बंटा’ गोळ्यांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने हा साठा जप्त करत गुन्हा दाखल केला.
पुढील तपासात या प्रकरणातील आरोपीचे नाव विष्णू रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) असे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या ‘बंटा’ गोळ्यांचा वापर फुलचंद पानामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहरात अशा प्रकारे अमली पदार्थांचा वापर किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.
Web Summary : Pune police busted a drug operation, arresting one person. 'Banta' pills, used in 'Fulchand Paan' for intoxication, were seized. The seized goods are worth ₹3.38 lakh. Investigation continues to find other involved parties.
Web Summary : पुणे पुलिस ने एक ड्रग ऑपरेशन का भंडाफोड़ किया, जिसमें एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया। नशे के लिए 'फुलचंद पान' में इस्तेमाल होने वाली 'बंटा' गोलियां जब्त की गईं। जब्त माल ₹3.38 लाख का है। जांच जारी है।