Pune: सिनेमा पाहून जेवायला जाताना दुर्दैवी घटना; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:31 IST2024-09-09T16:31:11+5:302024-09-09T16:31:58+5:30
यू-टर्न घेत असताना भरधाव कार चालकाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला

Pune: सिनेमा पाहून जेवायला जाताना दुर्दैवी घटना; भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे: जेवणासाठी दुचाकीवरून जाणार्या महाविद्यालयीन तरुणांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे - नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तर दुचाकीचालक जखमी झाला आहे.
सुधांशू राज (२२, रा. युनाईट पिजी हॉस्टेल, मॅजेस्टिक सिटी, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव रणधीर कुमार (२२, रा. सदर, मुळ रा. पटना, बिहार) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार (एमएच १२ क्युटी ४७१०) या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री सव्वा दोनच्या सुमारास नगर पुणे रस्त्यावरील गाडे वस्ती येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी वैभव कुमार आणि मयत सुधांशू राज हे वाघोली परिसरातील एका महाविद्यालयात पहिल्या वर्षांचे शिक्षण घेत आहे. घटनेच्या रात्री ते विमान नगर येथील एका सिनेमागृहात चित्रपट पाहायला आले होते. चित्रपट झाल्यानंतर जेवायला मित्रमैत्रिणी सोबत दुचाकीवरून जात होते. यावेळी गाडे वस्ती येथे असणाऱ्या एका फर्निचरच्या दुकानासमोरून यू-टर्न घेत असताना भरधाव कार चालकाने फिर्यादी वैभव कुमार चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. यात पाठीमागे बसलेला सुधांशू राज गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता पळ काढला. जखमी वैभव कुमार याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घोरपडे करत आहेत.