Pune: देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; युगांडाच्या २ महिलांची सुटका, फ्लॅट मालकासह विदेशी महिलेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:10 IST2026-04-16T20:09:37+5:302026-04-16T20:10:12+5:30
पोलिसांनी छापा टाकल्यावर युगांडा देशाच्या २ पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले

Pune: देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; युगांडाच्या २ महिलांची सुटका, फ्लॅट मालकासह विदेशी महिलेवर गुन्हा दाखल
लोहगाव (पुणे) : पोरवाल रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर लोहगाव पोलिसांनी छापा टाकून मोठ्या कारवाईची नोंद केली आहे. या कारवाईत दोन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली असून, वेश्याव्यवसाय चालवणारी युगांडाची महिला आणि तिला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगाव पोलीस स्टेशनच्या पथकाला पोरवाल रोडवरील 'दुर्वा हेरीटेज' सोसायटीतील फ्लॅट नंबर ४०३ मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (दि. १५ एप्रिल) रात्री ७:५० च्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी युगांडा देशाच्या दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले.
या प्रकरणी पोलिसांनी नामपिज्जा रिटाह (वय ३९, रा. युगांडा) ही महिला पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून हा व्यवसाय करवून घेत होती. रुपेश रमेश पिवाल (वय ४०, रा. वानवडी, पुणे): याने स्वतःच्या मालकीचा फ्लॅट वेश्याव्यवसायासाठी उपलब्ध करून दिला आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवला. पोलिसांनी घटनास्थळावरून ६४,६०० रुपये रोख, मोबाईल हँडसेट, पासपोर्ट, कंडोम पाकिटे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार परवीन लियाकत शेख यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.